Empuraan Conflict by RSS : मोहनलाल अभिनीत ‘एम्पुरान’ चित्रपटावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्षेप घेतल्यानंतर आता या चित्रपटात बदल करण्यात येणार आहेत, असं तिरुअनंतपुरममधील प्रादेशिक केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. “आम्हाला याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने आधीच प्रमाणित केलेल्या चित्रपटात स्वेच्छेने बदल करण्याची तरतूद आहे. त्यांनी बोर्डाशी संपर्क साधला आहे आणि सामान्यतः बोर्डाने आधीच मान्यता दिलेल्या चित्रपटात आम्ही स्वेच्छेने बदल करण्यास परवानगी देतो. कोणते बदल करायचे हे त्यांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. आमच्या प्रक्रियेनुसार, आम्ही स्वेच्छेने बदल करण्यास परवानगी देतो”, असे अधिकाऱ्याने सांगितले.
राष्ट्रविरोधी घटकांना खुश करण्याचा प्रयत्न
‘एम्पुरान’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. अभिनेता-दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘एम्पुरान’ हा चित्रपट २००२ च्या गुजरात दंगलींच्या संदर्भांमुळे वादळाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक उजव्या विचारसरणीच्या गटांनी आणि समर्थकांनी आरोप केला आहे की या चित्रपटात हिंदू धर्माचा “अपमान” करण्यात आला आहे आणि चित्रपटाचा उद्देश “राष्ट्रविरोधी घटकांना खुश करणे” आहे. भाजपाने या चित्रपटावर टीका करणे किंवा आक्षेप घेणं टाळले असले तरीही संघ परिवाराने यावर हरकत नोंदवली. आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधूनही या चित्रपटावर हल्ला चढवण्यात आला.
हिंदूंना खलनायक म्हणून सादर केले
ऑर्गनायझरच्या वेबसाइटवरील एका लेखात असा दावा करण्यात आला आहे की, “समीक्षक आणि चाहते दोघेही असा प्रश्न विचारत आहेत की फुटीरतावादी राजकीय अजेंड्यासाठी सिनेमाचा वापर केला आहे का?” गुजरात हिंसाचाराचा संदर्भ देत लेखात म्हटलं आहे की या चित्रपटाद्वारे हिंसाचाराचा वापर करून हिंदू समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, हिंदूंना खलनायक म्हणून सादर केले गेले, खरंतर त्यांना तारणहार म्हणून चित्रित केलं गेलं पाहिजे होतं.”
दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न
“ही दृश्ये केवळ धक्कादायक मूल्याच्या पलीकडे जातात; २००२ च्या दंगलींमध्ये हिंदूंची प्रतिमा मुख्य आक्रमक म्हणून बळकट करण्यासाठी, दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि हिंदूंना खलनायक म्हणून चित्रित करण्यासाठी हेतुपुरस्सर डिझाइन केले आहे”, असंही या लेखात म्हटलं आहे. मोहनलालचा उल्लेख करताना लेखात म्हटले आहे, “अशा फुटीर आणि राजकीयदृष्ट्या आरोपित कथेला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटात काम करण्याचा अभिनेत्याचा निर्णय त्याच्या निष्ठावंत चाहत्यांशी विश्वासघात आहे.”
हा चित्रपट राष्ट्रविरोधी
काही भाजप नेते या चित्रपटाविरुद्ध बोलले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सरचिटणीस आणि भाजप युवा शाखेचे नेते के. गणेश यांनी शनिवारी म्हटले की, हा चित्रपट राष्ट्रविरोधी आहे. दिग्दर्शक पृथ्वीराज यांच्या परदेशी संबंधांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रभाव होता का यावर शंका घेणे योग्य ठरेल”, असंही ते म्हणाले.
काही शब्द आधीच वगळण्यात आले
वाद वाढत गेल्याने चित्रपटाचे निर्माते गोकुलम गोपालन म्हणाले, “चित्रपटाचा उद्देश कोणालाही दुखावण्याचा नव्हता. चित्रपटातील कोणत्याही संवाद किंवा दृश्यामुळे कोणाचेही मन दुखावले असेल तर आवश्यक ते बदल करण्यास मी दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन यांना सांगितले. काही शब्द आधीच वगळण्यात आले आहेत. चित्रपटातील काही गोष्टींविरुद्ध निषेध आहे. मी दिग्दर्शकाला आवश्यक ते बदल करण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही राजकारणात सहभागी नाही”, असंही गोपालन यांनी माध्यमांना सांगितले.