विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास पक्षात अनेक इच्छुक असताना भारतीय जनता पक्षाने पारंपारिक मित्र असलेल्या शिक्षक परिषदेला पाठिंबा देऊन पक्षांतर्गत बंडाळी थोपवली, नेमकी हीच परिस्थिती काँग्रेसमध्ये होती. पण काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट भूमिका न घेतल्याने जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे काँग्रेसमध्ये दुफळी तर माजली शिवाय समर्थित शिक्षक संघटनाही दुरावल्या परिणामी याचा फटका मविआच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसशी संबंधित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा बालेकिल्ला होता. या संघटनेचे विश्वनाथ डायगव्हाणे येथून सलग तीन वेळा निवडून आलेले. पण २०११ मध्ये हा बालेकिल्ला भाजप समर्थिक शिक्षक परिषदेने खिंडार पाडले. परिषदेचे नागो गाणार येथून सलग दोन वेळा विजयी झाले आणि आता तिसऱ्यांदा ते रिंगणात आहेत. यंदा ही जागा भाजपने लढवावी यासाठी पक्षाच्या शिक्षक आघाडीतूनच दबाव होता. कारण गाणार यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती. त्यांचे वय आणि प्रकृतीची सुद्धा कारणे होती. पुन्हा त्यांनाच पाठिंबा दिल्यास पक्षातील शिक्षक आघाडीतील नेत्यांची संधी डावलली जाणार होती. त्यामुळे अनेकांनी या जागेसाठी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे शिक्षक परिषद की पक्षाची शिक्षक आघाडी यापैकी एक पर्याय निवडण्याचे आव्हान भाजप पुढे होते. दरम्यान भाजप स्वत: ही निवडणूक लढवत असल्याचे लक्षात येताच शिक्षक परिषदेने भाजपशी चर्चा न करताच गाणारांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली होती. शिक्षक परिषदेला पाठिंबा दिला नाही तर अनेक वर्षापासूनसोबत असलेली ही संघटना दुरावण्याची भीती होती व स्वत: निवडणूक लढवायची म्हंटले तर इच्छुकांच्या गर्दीतून उमेदवार ठरवण्याचे आव्हान होते. एकाला उमेदवारी दिली तर अनेक नाराज होण्याची व त्याचा निवडणुकीत फटका बसण्याचाही धोका होता. यापूर्वी पदवीधरमध्ये उमेदवार बदलण्याची खेळी भाजपच्या अंगलट आली होती. त्यामुळे पक्षाने यावेळी सावध भूमिका घेत परिषदेच्या गाणार यांना पाठिंबा देऊन पक्षातील संभाव्य बंडाळी रोखली. त्यामुळे भाजप आणि परिषद एकत्रितपणे निवडणुकीत उभी ठाकणार आहे.
हेही वाचा- “संसद नव्हे तर संविधान सर्वोच्च”, उपराष्ट्रपतींच्या विधानावर पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया
दुसरीकडे काँग्रेसची स्थितीही अशीच होती. काँग्रेस ही जागा लढवत नसली पक्षाचा पाठिंबा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला असतो. याही वेळी काँग्रेसने हीच भूमिका घ्यावी,अशी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची इच्छा होती. यासाठीपक्षाचे अनेक मोठेनेते आग्रही होते. त्यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे हीच मागणी केली होती. त्याचबरोबर आमदार कपील पाटील यांच्या लोकभारतीची शिक्षक संघटना शिक्षक भारतीनेही काँग्रेसला पाठिंबा मागितला होता. तो देण्याचा शब्द काँग्रेसच्या काही नेत्यांनी पाटील यांना दिला होता. पारंपारिक मित्र असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेला पाठिंबा देऊन काँग्रेसला भाजप विरोधात भक्कम आव्हान उभे करता आले असते. पण पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने पाठिंबा कोणाला द्यायचा यात वेळ वाया घालवण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेनेने या जागेवर दावा केल्याने ती जागा त्यांच्यासाठी सोडण्यात आली. यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली.
हेही वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्तपणे लढण्यावर महाविकास आघाडीत ऐक्य
एकीकडे पक्षाशी अनेक वर्षापासून जुळलेली विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना दुरावली व दुसरीकडे शिक्षक भरतीला दिलेला शब्दही पाळता आला नाही. शिवाय काँग्रेसच्या धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेलाही आता या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे किंवा नाही असा प्रश्न पडला.‘एकूणच तेलही गेले अन् तुपही गेले’ अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. दरम्यान आता झालेली चूक लक्षात आल्यावर काँग्रेसने आता ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. १५ जानेवारीला म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या मुदती आधी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवली आहे.