नागपूर : देशभरात काँग्रेसची जी वाताहत होत आहे ती पाहूनही त्यातून कुठलाही धडा न घेण्याचे धोरणच जणू काँग्रेसजनांनी स्वीकारले आहे. याबाबतीतले चित्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत सारखेच आहे. नागपूरही त्याला अपवाद नसल्याचे पुन्हा नव्याने अधोरेखित झाले आहे. या निमित्त ठरले, नागपुरात नवसंकल्प अभियानातंर्गत आयोजित शिबिर. समाज माध्यमातून पक्षाची भूमिका मांडण्यासोबतच देशभरात काँग्रेसविरुद्ध सुरू असलेल्या खोट्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र या अभियानाच्या निमित्ताने नागपुरातील काँग्रेसची गटबाजी पुन्हा चव्हाटयावर आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर देऊन काँग्रेसची प्रतिमा उजळण्याचे काम काँग्रेसच्या समाज माध्यम विभागाने हाती घेतले आहे. उदयपूर येथे काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरानंतर पक्षाने समाज माध्यमांचा अधिक प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. याच क्रमात प्रदेश सरचिटणीस व प्रदेश समाज माध्यम विभाग प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी वनामती सभागृहात शिबीर आयोजित केले. या शिबिरासाठी राज्यभरातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आमंत्रित करण्यात आले. राज्यस्तरिय कार्यक्रम असल्यामुळे पक्षाच्या सर्व स्थानिक नेत्यांसह राज्यातील काही मंत्र्यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, क्रीडामंत्री सुनील केदार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, युवक काँग्रसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे गेली. परंतु, या शिबिराचे आयोजन विशाल मुत्तेमवार यांनी केल्यामुळे गटबाजीच्या रूपात मिठाचा खडा अखेर पडलाच.
मुलाच्या प्रेमापोटी ज्येष्ठ नेते व माजी खासदार विलास मुत्तेमार कार्यक्रमाला आले. प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेही उपस्थित राहिले. मात्र त्यांना वगळता शहरातील एकही ज्येष्ठ नेता पहिल्या दिवशी तरी या शिबिराकडे फिरकला नाही. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबीर नागपुरात होत असताना व यामध्ये भाजपच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासोबत काँग्रेसच्या सकारात्मक बाबी जनतेसमोर मांडण्याचा संकल्प केला जात असताना काँग्रेसच्याच नेत्यांकडून अशी पक्षाची उपेक्षा अनेकांना खटकली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मागदर्शन मिळणार नसेल व ते स्वत:च या अभियानाकडे पाठ फिरवतील तर कार्यकर्त्यांमध्ये नवसंकल्पना कशी रुजणार, असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना विचारत होते.