सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे संकेत गुरुवारी मिळाले आहेत. भाजपने हे दोन्ही मतदारसंघ सोडताना आपले उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्याचे ठरवले आहे. या राजकीय व्यूहरचनेमुळे या दोन्ही मतदारसंघांतील अजित पवारांना मानणारा मतदार, तसेच यातून पारंपरिक युतीचा मतदारदेखील अजित पवार यांच्या पक्षाशी जोडला जाईल. तसेच दोन्ही मतदारसंघात आजवर रुजलेल्या ‘घड्याळ’ चिन्हाचाही त्यांना फायदा होईल असा विचार महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम पातळीवर बोलणी सुरू असून सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे इस्लामपूरमधून आमदार जयंत पाटील, शिराळामधून आमदार मानसिंगराव नाईक आणि तासगाव-कवठेमहांकाळमधून आरआर आबांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. या ठिकाणी भाजपनेही तयारी केली आहे. मात्र, या दोन्ही मतदारसंघात सातत्याने राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वी घड्याळ चिन्हावर निवडून येत असल्याने या जागांवर महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे.

हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

इस्लामपूर हा आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनी दावा केला असून गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढत दिली होती. तर शिवसेनेकडूनही (शिंदे) या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. या पक्षाकडून जिल्हा प्रमुख आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर तासगावमध्ये संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.

घड्याळ चिन्हाचा फायदा?

या पार्श्वभूमीवर भाजपने हे दोन्ही मतदारसंघ सोडताना आपले उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्याचे ठरवले आहे. या राजकीय व्यूहरचनेमुळे या दोन्ही मतदारसंघांतील अजित पवारांना मानणारा मतदार, तसेच यातून पारंपरिक युतीचा मतदारदेखील अजित पवार यांच्या पक्षाशी जोडला जाईल. तसेच दोन्ही मतदारसंघात आजवर रुजलेल्या ‘घड्याळ’ चिन्हाचाही त्यांना फायदा होईल असा विचार महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामुळे आमदार जयंत पाटील मतदारसंघात गुंतून राहतील असाही व्होरा यामागे आहे. पक्षाकडे प्रबळ उमेदवार नसला तरी भाजपकडून उसनवारीवर उमेदवार घेऊन ही निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे.