नागपूर : नगरसेवक ते आमदार आणि त्यानंतर आमदार ते पहिल्यांदा मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री या प्रवासात देवेंद्र फडणवीस यांना साथ देणारे त्यांचे मित्र, विश्वासू संदीप जोशी यांना अखेर आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याच्या फडणवीस यांच्या प्रयत्नानाअखेर यश आले .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे संदीप जोशी यांची राजकीय कारकीर्द नगरसेवक ते महाापौर अशी आहे.

२००२ ते २०२२ असे सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. २०२०-२१ मध्ये ते महापौर झाले. फडणवीस यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळणारे जोशी यांची ओळख ही फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनच आहे. फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांच्या प्रथम नागपूर आगमनानिमित्त आयोजित केलेली मिरवणूक व त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद याचे श्रेय संदीप जोशी यांच्या नियोजनाला जाते. फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर जोशींकडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. मात्र २०२० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघातून पक्षाचे तत्कालीन विद्यमान आमदार अनिल सोले यांना डावलून फडणवीस यांनी जोशी यांना उमेदवारी दिली.

पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे जोशी पराभूत झाले. ही सल फडणवीस यांच्या मनात होती व तेंव्हापासून जोशींच्या पुनर्वसनासाठी ते प्रयत्न करीत होते. २०२३ मध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जोशी यांची उपमु्ख्यमंत्र्यांचे मानद सचिव म्हणून नियुक्ती केली होती. पण जोशींना आमदार करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. नाही म्हणायला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जोशी समर्थकांनी पश्चिम नागपूरमधून जोशी यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. पण त्यात जोर नव्हता. या निवडणुकीत फडणवीस यांच्या मतदारसंघातील सर्व प्रचार यंत्रणा जोशी आणि चमूनेच सांभाळली होती.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांना मध्य नागपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली व अटीतटीच्या लढतीत दटके विजयी झाले. त्यामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली. तेंव्हापासून या जागेवर जोशींच्या नावाची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शक्ती जोशी यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्टीकडे लावली होती. पण दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेल्या तीन नावांच्या यादीत जोशी यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे पुन्हा जोशी यांच्या पदरी निराशाच येते की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात जोशींच्या नावाला हिरवा कंदिल मिळाला अन फडणवीस यांना मित्राला आमदार करण्याच्या आश्वासनाची पूर्ती करता आली. जोशी यांच्या नावाची घोषणा होताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोशी यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करून होते.