Who is Swara Bhasker’s Husband Fahad Ahmad : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी विवाह केला आहे. स्वराने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर दोघांचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून तिच्या लग्नाची माहिती दिली आहे. यात व्हिडीओत दोघांनी केलेल्या रजिस्टर मॅरेजचे दस्तावेजदेखील आहेत. दस्तावेजांनुसार दोघांनी ६ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत लग्न केलं आहे.

फहाद अहमद समाजवादी पार्टीच्या युवा शाखेच्या मुबई आणि महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी १९९२ चा जन्म असलेले फहाद हे मुळचे उत्तर प्रदेशमधल्या बरेलीतले रहिवासी आहेत. फहाद यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर एम-फिल करण्यासाठी मुंबईत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये आले. इथूनच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं.

टाटा इन्स्टिट्युटमध्ये शिकत असताना फहाद अहमद स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून निवडून आले आणि २०१७ ते २०१८ पर्यंत या पदावर कायम होते. आता ते इथूनच पीएचडी करत आहेत.

सीएएविरोधातल्या मोर्चादरम्यान चर्चेत

२०१७-१८ मध्ये टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एससी-एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ केल्यानंतर संस्थेच्या आवारात काढलेल्या मोर्चावेळी फहाद अहमद हे चर्चेत आले. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर सीएए कायद्याविरोधात त्यांनी मुंबईत मोर्चा काढला होता.

हे ही वाचा >> ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून पुन्हा वातावरण तापले

अबू आझमी यांच्याशी जवळचे संबंध

फहाद अहमद हे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या विश्वासातले आहेत. आझमी यांनीच अहमद यांना पक्षात आणि राजकारणात आणलं. जुलै २०२२ मध्ये अबू आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत त्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता.