नाशिक: नामसाधर्म्य, बंडखोरी, महायुतीतील बिघाडी, शिक्षक मतदारांना दाखविली जाणारी प्रलोभने अशा विविध कारणांनी गाजणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बनावट मतदारांचा मुद्दा देखील अखेरच्या टप्प्यात चर्चेत आला आहे. या मतदारसंघात हजारोंच्या आसपास बनावट शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी झाल्याचा आरोप करीत हे मतदार शोधून त्यांच्यासह संबंधितांची बनावट नोंदणी करणाऱ्या शिक्षण संस्थांवर खटले दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे, प्राप्त मतदार नोंदणी अर्जांची छाननी होऊन त्यावर निर्णय घेतला गेला असून अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्याचा दावा निवडणूक यंत्रणेने केला आहे.

नाशिक लोकसभेनंतर शिक्षक मतदारसंघातही शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले आहेत. शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांच्यासह एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाल्यानंतर महायुतीत नाराजी पसरली, पण उघड बंडखोरी झाली नव्हती. यावेळी ती कसर भरून निघाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने अधिकृत उमेदवार दिला तर, भाजपशी संबंधित कोल्हेंनी बंडखोरी केली. महायुतीत बिघाडी झाल्यामुळे नाशिकची जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरावे लागले. एक दिवसीय दौऱ्यात त्यांनी पाच जिल्ह्यांत पसरलेल्या शेकडो संस्था चालकांशी संवाद साधला. शिक्षण संस्था, शिक्षक आणि आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची ही संधी असल्याचे शिंदे यांनी सूचित केले.

हेही वाचा : समलैंगिक अत्याचारप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाला अटक; कोण आहे सूरज रेवण्णा?

शिवसेना ठाकरे गटानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीत बिघाडी नसली तरी संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे दोन अपक्ष उमेदवार त्यांची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. दिंडोरी लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना एक लाखहून अधिक मते नामसाधर्म्यामुळे गमवावी लागल्याचा ताजा इतिहास आहे. सुशिक्षित मतदारांमध्ये नामसाधर्म्याने तसाच संभ्रम निर्माण प्रयत्न होत असल्याने महाविकास आघाडीला प्रचारात नेमके कुणाला, कसे मतदान करायचे हे सांगण्यात बरीच शक्ती खर्च करावी लागत आहे. शिक्षक मतदारांना आपलेसे करण्यासाठी पैठणी, सोन्याची नथ, सफारीचे कापड दिले जात असून या प्रलोभनांविरोधात शिक्षणतज्ज्ञांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

या घटनाक्रमात बनावट शिक्षक मतदारांची नोंदणी झाल्याच्या आरोपाची भर पडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशा बनावट शिक्षकांचा शोध घ्यावा. त्यांच्यासह संबंधित संस्थांविरोधात खटले दाखल करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा : इकडे राहुल-तिकडे अखिलेश, मध्ये अयोध्येचा खासदार! शपथविधीला विरोधकांनी कोणकोणत्या प्रतिकात्मक गोष्टी केल्या?

नाशिक शिक्षक मतदार संघात ६९ हजार ३६८ शिक्षक मतदार आहेत. २०१८ मध्ये या मतदारसंघात ५३ हजार ८९२ मतदार होते. गतवेळच्या तुलनेत यंदा १५ हजारहून अधिकने मतदार संख्या वाढली. प्रचारात मतदार नोंदणी प्रकियाही आरोप-प्रत्यारोपांच्या कचाट्यात सापडली. नोंदणी प्रक्रियेवेळी या संदर्भात आक्षेप नोंदविता आले असते. अर्जांची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली. आता त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : परिपक्व नाही म्हणणार्‍या पुतण्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी; यामागची नेमकी रणनीती काय?

शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक १९ भरावा लागतो. संबंधित व्यक्तीने मागील सहा वर्षातील तीन वर्ष शिक्षक म्हणून काम केलेले पाहिजे. मुख्याध्यापक संबंधिताला तसा दाखला देतात. त्याची निवडणूक यंत्रणा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खात्री करून घेते. संबंधित मतदाराचे पत्ते तपासले जातात. प्रांताधिकारी अर्थात सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी पडताळणीअंती खात्री करून करून स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेले आहेत. ज्यांचा शिक्षक म्हणून कालावधी परिपूर्ण नव्हता वा अन्य कारणांस्तव अनेकांचे अर्ज बाद झाले.