Farmer leader Dallewal : शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या बेमुदत उपोषणाला ४० दिवस उलटले आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्यांची भेट घेतली. तुम्ही वैद्यकीय उपचार घ्या असं आवाहन या समितीने डल्लेवाल यांना केलं. संयुक्त किसान मोर्चाचे संयोजक जगजीत सिंह डल्लेवाल हे शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी आणि कायदेशीर हमीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. २६ नोव्हेंबर २०२४ पासून त्यांचं उपोषण सुरु आहे.
जगजीत सिंह डल्लेवाल खनौरी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत
जगजीत सिंह डल्लेवाल हे खनौरी या ठिकाणी म्हणजेच पंजाब-हरियाणाच्या सीमेवर उपोषणासाठी बसले आहेत. त्यांनी त्यांच्या अंथरुणातूनच महापंचायतीला संबोधित केलं. प्राण गेले तरी बेहत्तर पण मी मागण्या मान्य झाल्याशिवाय बेमुदत उपोषण मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की होतं की डल्लेवाल यांचं आयुष्य अमूल्य आहे. पण मग माझा न्यायालयाला हा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्या त्यांच्या मुलांचं काय? अजूनही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. भविष्यात एकाही शेतकऱ्याने असं पाऊल उचलायला नको. त्यासाठी मला वाटतंय की मी त्याग करावा, मला काहीही झालं तरीही चालेल. पण शेतकऱ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवता कामा नये.” असं डल्लेवाल यांनी म्हटलं आहे.
डल्लेवाल म्हणाले आता आमची लढाई करो या मरोची लढाई आहे
डल्लेवाल यांना कर्करोग आहे. ४० दिवस उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी कुठलेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. डल्लेवाल यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला, त्यावेळी डल्लेवाल म्हणाले ही आमची करो या मरोची लढाई आहे.
शेतकरी आत्महत्या होऊ नयेत हेच माझं मत-डल्लेवाल
डल्लेवाल म्हणाले, सर्वोच्च न्यालयालाने माझ्या प्रकृतीची विचारपूस केली, चिंता व्यक्त केली. मी ज्या मागण्यांसाठी उपोषण सुरु केलं आहे त्या मागण्या केंद्राने पूर्ण केलेल्या नाहीत. MSP बाबत कायदेशीर मार्ग हवा असंही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. ही मागणीही मी केंद्र सरकारकडे केली आहे. दुसरी महत्त्वीची गोष्ट आम्ही काही सीमा भागात आंदोलन करुन रस्ते अडवून धरलेले नाहीत. आम्ही आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने करतो आहोत. तसंच पंजाबमधला शेतकरी गहू पिकवतो. त्याला त्यासाठी योग्य भाव मिळत नाही हे वास्तव आहे त्यामुळेच उपोषणाला बसल्याचं आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं डल्लेवाल यांनी म्हटलं आहे.