पंजाब पोलिसांनी काल बुधवारपासून शंभू आणि खनौरी सीमेजवळील भागात मोठी कुमक जमा केली. १३ महिन्यांपासून पंजाबचे शेतकरी येथे आंदोलन करत आहेत. किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वन सिंग पंधेर आणि संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजित सिंग दल्लेवाल यांना आंदोलनस्थळी पोहोचण्याच्या आधीच ताब्यात घेण्यात आले आहे. उद्योग व व्यापारमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. या बैठकीवरून परततानाच दोन्ही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांची धडक कारवाई

या दोन्ही नेत्यांना ताब्यात घेण्याच्या काही तासांपूर्वीच अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, राज्य प्रशासनाने अशी कोणतीही कारवाई होणार नाही, असं आश्वासन शेतकरी नेत्यांना दिले होते. खनौरी आणि शंभू सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा वीजपुरवठा खंडित करून, मशालींचा वापर करीत ही कारवाई केली. खनौरी सीमेवर पोलिसांचे पथक येण्यापूर्वी पटियालाचे पोलीस उपमहानिरीक्षक मनदीप सिंग सिद्धू यांनी शेतकऱ्यांना आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये जाण्यास सांगितले.
“आमच्याकडे तीन हजारांहून अधिक लोक आहेत आणि तुम्ही फक्त २५० जण आहात. कुठल्याही परिस्थितीत आम्ही जागा रिकामी करूच, तुमच्या नेत्यांना चंदिगडमधून आधीच ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्हाला बळाचा वापर अजिबात करायचा नाही”, असे आवाहन यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना केले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दल्लेवाल आणि पंधेर या दोन्ही नेत्यांनी आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान, हे दोन्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करण्यास गेले होते. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. चर्चा करून परतताना झिरकपूरजवळ पोलिसांनी दल्लेवाल यांची रुग्णवाहिका ताब्यात घेतली आणि पंधेर यांना मोहालीजवळ ताब्यात घेण्यात आले.

दल्लेवाल आणि पंधेर यांच्यासोबतच्या शेतकरी नेत्यांना, तसेच इतर कार्यकर्त्यांनाही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी दल्लेवाल यांना प्रथम रुग्णालयात नेले आणि पंधेर यांना पटियालातील बहादूरगडमधील कमांडो प्रशिक्षण केंद्रात पाठवले.

अनेकदा चर्चा होऊनही या आंदोलक शेतकऱ्यांवर आम आदमी पक्षाने कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. काल झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितले, “सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळविण्यासाठी त्यांनी दिलेला तपशील हा समाधानकारक नाही”. तेव्हा आता पुढच्या चर्चेसाठी ४ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

अचानक कारवाईचे कारण काय?

व्यापाराला अडथळा ठरणारं आंदोलन शेतकऱ्यांनी थांबवलं नाही तर आगामी लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत आमची मतं मिळणार नाहीत असं व्यापाऱ्यांनी आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना सांगितलं. यानंतर शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आंदोलनस्थळावरून दोन्ही नेत्यांना ताब्यात घेताना मोठ्या अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागला असता. त्यामुळेच बैठकीहून निघाल्यावर या दोघांचाही माग काढत त्यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांनी या कारवाईच्या तयारीची सुरुवात केली होती. या दोन्ही सीमाभागांत पाण्याच्या तोफा, क्रेन, ट्रॉली अशी तयारी करण्यात आली होती.

“जवळपास ५०० च्या संख्येत पोलीस इथे आले होते. २१ मार्चला शेतकऱ्यांचा आणखी एक गट इथे येणार होता. त्यामुळे यावेळी गर्दी कमी होती. या परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आल्याने काही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता आले नाहीत”, असे एका शेतकरी आंदोलकाने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतल्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे आंदोलनस्थळावरील तंबू, तसेच शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी वापरलेल्या ट्रॉली इत्यादी बाजूला करण्याचे काम सुरू होते.