मुंबई : राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार सोहळ्यादरम्यान रविवारी वरळी येथील कार्यक्रमात गोंधळ उडाला. राज्यपालांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी हा गोंधळ झाला. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी शांत झाले. या गोंधळावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली असून शेतकऱ्यांना अपमानित करणे चुकीचे असल्याचे सांगितले.
कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या वर्ष २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांचे ४४८ पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन. एस. सी. आय. क्रीडासंकुलात करण्यात आले. या सोहळ्यास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहिले.
हेही वाचा >>> आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका;‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकासाला गती- मोदी
कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना नागपूरला जायचे होते. त्यामुळे प्रत्येक गटात प्रातिनिधिक पुरस्कार देण्यात येतील, असे सूत्रसंचालकाने ऐनवेळी घोषित केले. यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. शेतकऱ्यांनी फेटे उडवून त्याचा निषेध केला. शेवटी मुंडे यांनी मध्यस्थी करीत सर्व शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असे जाहीर केले. त्यानंतर पुरस्कार सोहळा सुरळीत सुरू झाला.
२०२३ मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादकांना दरामध्ये झालेल्या नुकसानीपोटी प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टर मर्यादेत देण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यापालांकडून गौरव
कृषी क्षेत्रातील राज्याची भरारी वाखणण्याजोगी आहे. उत्पादन वाढीसाठी बळीराजा करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. शेतकरी माझ्यासोबत छायाचित्र काढत नाही, तर मीच शेतकऱ्यांसोबत छायाचित्र काढत आहे, असे सांगून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी स्वहस्ते सर्व ४४८ पुरस्कारार्थीं शेतकऱ्यांचा गौरव केला.