सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: दहा वर्षे दुष्काळाची. त्यानंतर सलग तीन वर्षे अतिवृष्टीची. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हतबलता आता टिपेला पोहोचलेली आहे. पीक विम्याचा गुंता ना सरकारने सोडविला ना शेतकऱ्यांना तो कळाला. पीक वाया गेले की डोळ्यातून पाणी वाहते. आता भेटेल तो प्रश्न सोडवू शकेल अशी आशा असणाऱ्या माणसासमोर शेतकरी अक्षरक्ष: ढसाढसा रडतात. कोणी तरी मदत देईल या आशेवरची हतबलता शब्दांनी टिकून कशी राहील, असा सवाल उभा ठाकला आहे. सोयाबीनच्या शेंगा फुटल्या आहेत. कापसाच्या मुळ्या सडल्या आहेत. मक्याच्या कणसाला जागेवर कोंब आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ढवळापुरीचे शेतकरी नाना पुनाळे म्हणाले, ‘आता जगण्याचा चिखल झाला आहे.’ शेतकऱ्यांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच हतबलता प्रकट करणारी. १७ लाख २२ हजार ९११ शेतकरी अतिवृष्टीने बाधित आहेत. मराठवाड्यात खरीप हंगामात पेरणी झालेल्या ४८ लाख ३० हजार हेक्टरवरील पेरणीपैकी २६ लाख ६७ हजार ५९४ हेक्टरवरील पिके बाधित आहेत. म्हणजे एकूण पेरणी क्षेत्राच्या ५५ टक्के पिके बाधित आहेत.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?

मराठवाड्यात ४५० महसूल मंडळे. त्यातील ३१३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या ३१३ मंडळांपैकी १८६ महसूल मंडळांत सरासरी तीन वेळा पावसाने झोडपले. पण ज्या मंडळात ६० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस सातत्याने झाला, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश २२ ऑक्टोबर रोजी निघाले आणि यंत्रणा आता पुन्हा कामाला लागली. त्यामुळे मदत देण्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारी शोध मोहीम सुरू आहे. शिवारातल्या पाण्याचा अजून पुरेसा निचरा झालेला नाही. पण सडलेले हे पीक पाहण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी देण्यासाठी होणारा केंद्रीय पथकाचा दौरा खरीप पिके निघाल्यानंतर नेहमीप्रमाणे उशिरा येईल. त्यानंतर चार महिन्यानंतर केंद्राची मदत निधी जाहीर होईलही कदाचित, पण झालेले नुकसान आणि होणारी मदत यात निकष बदलून दुपटीने मदत दिली तरी शेतकरी संकटातून बाहेर येईलच असे नाही. बाधित क्षेत्राचे आकडे बदलण्याची आता घाई सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरील या कसरतीमध्ये आपल्या मतदारसंघातील आकडे कमी राहता कामा नयेत यासाठी आमदार आणि मंत्री आवर्जून लक्ष घालत आहेत.

हेही वाचा : बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्‍हा पडली ?

या पावसाळ्यातील नुकसान किती ?

या पावसाळ्यात वीज पडून, वाहून गेल्याने व भिंत पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ७८, तर १२८४ जनावरांचा मृत्यू झाला. घराची पडझड तर झालीच, शिवाय अनेकांचे शिवारही खरवडून गेले. हिंगोली जिल्ह्यात जमीन खरवडून गेल्याचे प्रमाण अधिक आहे. एका बाजूला जीवितहानी तर होतीच, तत्पूर्वी गोगलगायीने पीक कवेत घेतले होते. त्यातून वाचलेले पीक पावसाच्या स्वाधीन झाले. दोन कर्जमाफी, आता प्रोत्साहन अनुदानामुळे कर्जाचा बोजा काहीसा कमी होईल अशी स्थिती असताना नवे संकट उभे ठाकले आहे.

ओल्या दुष्काळाची मागणी आणि प्रतिमा संवर्धन

काही गावांमध्ये व शहरांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मादळमोही किंवा शिरुर, आष्टी सारख्या कायम अवर्षणप्रवण भागातही या वेळी एका तासात ११३ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. त्यात शिवारात पाणी साठल्याने ओल्या दुष्काळाची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या ओल्या दुष्काळाच्या केलेल्या मागणीला पाठिंबा दिला. हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मागणीलाही पाठिंबा असल्याचे सांगितले. अधून-मधून माध्यमांना ‘चावे’ (बाईट) देताना ओल्या दुष्काळाची मागणी केली जाते. त्यातून पक्षाची आणि नेत्याची प्रतिमा शेतकऱ्यांच्या मनात कोरली जावी असे प्रयत्न सुरू आहेत. मागणी करणाऱ्या नेत्यांना दुष्काळ जाहीर केल्यावर काय फायदा हाेईल हेही सांगता येत नाही. संकटग्रस्तांना मदत करतानाही ज्यांची नावे माध्यमांमध्ये झळकतात तेवढ्यांच्याच घरी दिवाळीचा फराळ देताना ‘ आम्ही दिली बरं का मदत’ हे आवर्जून ठसवले जात आहे. विशेष म्हणजे यात सत्ताधारी आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आघाडी घेतली होती. ‘होय, मी मुख्यमंत्री समर्थक’ असे शब्द लिहिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. संकटात मदत करण्यापेक्षाही मदत पोहोचवत आहोत हे दाखविण्याची अहमहमिका ऐन दिवाळीत सुरू होती. या वर्षी मराठवाड्यात १ जानेवारी ते २७ ऑक्टोबरपर्यंत ८२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हेही वाचा : उद्योगप्रश्नी केंद्राकडे दाद मागण्याचे धाडस शिंदे -फडणवीस सरकार दाखवणार का?; माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सवाल

आपलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

ढगफुटी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून पडतो आहे, असे वार्तांकन सुरू झाले आणि ओल्या दुष्काळाची मागणी पुढे येऊ लागली. तसे नेहमीप्रमाणे कृषिमंत्री सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याएवढा पाऊसच झाला नाही, असे वक्तव्य केले. मग टीका सुरू झाली, की त्यांनी तीन तासात तीन जिल्ह्यांचा दौरा केला. औरंगाबाद जिल्ह्यातील शेकटा, जालना जिल्ह्यातील एक गाव आणि बीड जिल्ह्यात त्यांनी पाहणी केली. आपण खूप फिरून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतो आहोत, असे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, पण त्यांच्यावर टीका झाल्यावर. सतत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे लेखी आदेश येण्यास उशीर झाल्याने यंत्रणा एवढे दिवस ठप्प होती. आता ती कामाला लागेल. त्यामुळे पंचनाम्याचे आकडे वाढतील. पण पीक विम्याचा गुंता मात्र काही सुटणारा नाही. उस्मानाबादचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे आमदार कैलास पाटील आता बेमुदत उपोषणास बसले आहेत. जर सरकार स्थापन करताना वाट्टेल ते करता येते तर संकटकाळी मदतीसाठीही असेच निकष- नियम या जंजाळातून मुक्त होऊन पाहावे अशी भावना सर्वत्र असल्याने ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ अशी भावना मराठवाड्यात आहे.