जम्मू काश्मीरमध्ये नुकताच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जवळपास १० वर्षानंतर ही निवडणूक झाल्याने राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाला मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी जम्मू काश्मीरचे राजकारण, संभाव्य निकाल, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती आणि विशेषत: हा अनुच्छेद ३७० बाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रश्न १) : जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीचा विजय होईल, अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार उभे राहिल्याने याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल असं वाटतं का?

उत्तर : यासंदर्भात मलाही माहिती नाही. आता सर्व जनतेवर अवलंबून आहे. आम्ही जनतेला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही अपक्ष उमेदवार हे भाजपाचे ए, बी आणि सी टीम आहेत. मात्र, मतदार सुज्ञ आहेत, ते योग्य निर्णय घेतील. त्यांना आमच्या मताचे विभाजन करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. यात काही उमेदवार असेही आहेत, ज्यांनी पाकिस्तानचे कौतुक केलं आहे. हेच उमेदवार आता भाजपाचे मित्र कसे झाले?

प्रश्न २) : तुम्हाला काय वाटतं? अपक्ष उमेदवार उभं करण्यामागे कोण आहे?

उत्तर : मला खात्री आहे, की यामागे केंद्रातील भाजपा सरकार आहे. त्यांना असं वाटतं की ते जनतेची मत विभाजित करू शकतात. अशाप्रकारे विभाजन करून आपण जम्मू काश्मीरमधील निवडणूक जिंकू असं त्यांना वाटतं. तुम्ही जर बघितलं तर आता हिंदू हिंदू हिंदू अशा घोषणा दिसून येत नाही. कारण त्यांना माहिती आहे, की ते निवडणूक हरणार आहेत. जम्मू काश्मीरमधील अनेक कंत्राटं ही बाहेरच्या लोकांना देण्यात आली आहे.

प्रश्न ३) : जर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाली तर..

उत्तर : अशा वेळी आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. नायब उपराज्यापालांच्या हातात राज्य देणं सोपी गोष्ट नाही. आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा हवा आहे. नायब राज्यपालांना असलेले विशेषाधिकार लगेच काढून घेतले पाहिजे. अन्यथा आम्ही आंदोलन करू.

प्रश्न ४) : त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास अपक्ष किंवा पीडीपीच्या मदतीने सरकार स्थापन केलं जाईल का?

उत्तर : विधानसभेच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण होईल की नाही, याबाबत काही सांगता येत नाही. पण एवढ नक्की आहे, की आम्ही कोणत्याही परिस्थिती भाजपाबरोबर जाणार नाही.

प्रश्न ५) : पीडीपी किंवा अपक्षांबरोबर मिळून सरकार स्थापन करणार का?

उत्तर : राजकारण अशक्य काहीही नाही. अपक्ष उमेदवार आमच्या विचाराचे असतील, तर आम्हाला काहीही अडचण नाही. आम्हाला भाजपासोडून कुणीही चालेल.

प्रश्न ६) : विधानसभेच्या निकालानंतर कुणाचंही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली तर….

उत्तर : त्याने कोणताही फरक पडणार नाही. त्यानंतर पुन्हा निवडणूक होईल. आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. फक्त लोकांना हे लक्षात येईल, की आपण ए बी सी उमेदवारांना मत देऊन चूक केली.

प्रश्न ७ ) तुम्ही सत्तेत आल्यानंतर कलम ३७० लागू करण्यासंदर्भातील ठराव करण्याबाबत तुमच्यावर दबाव असेल का?

उत्तर : कलम ३७० लागू करण्यासंदर्भातील ठराव पारित करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. आधीच्या दोन निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने कमल ३७० ही कायसस्वरुपी तरतूद असल्याचे म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायाधीस या मताशी सहमत आहेत, हे सांगता येणार नाही. त्यामुळे याबाबत कायदेशीर लढा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रश्न ८) तुम्ही कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिलं आहे, त्याबाबत काय सांगाल?

उत्तर : मला यासंदर्भात वाद निर्माण करायचा नाही. आम्हाला पुढे जायचं आहे. राज्याचा विकास करायचा आहे. येथील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करायचा आहे. तसेच बाहेरच्या लोकांना दिलेली कंत्राटं काढून घ्यायची आहे. या कंत्राटांवर राज्यातील नागरिकांचा पहिला अधिकार आहे. नक्कीच आम्ही कमल ३७० लागू करण्यासाठी प्रयत्न करू, पण सध्या विकास महत्त्वाचा आहे.

प्रश्न ९) यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं दिसून आलं आहे. याचं नेमकं कारण काय?

उत्तर : नागरिकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यांना त्यांची ताकद दाखवायची आहे. भाजपाच्या द्वेषपूर्ण राजकारणाला जनता कंटाळली आहे.

प्रश्न १०) काश्मीर खोऱ्यात राहुल गांधींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे, तुम्हाला वाटतं?

उत्तर : राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच बदल दिसतो आहे. त्यांच्या संसदेतील भाषणातही तो दिसून आला आहे. त्यांना द्वेषमुक्त भारत बनवायचा आहे. जिथे सर्व नागरिक स्वाभिमानाने राहू शकतील.