Punjab Budget Session: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. नुकतचे सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात विरोधकांऐवजी ‘आप’च्या आमदारांनीच सरकारला धारेवर धरत जाब विचारला. मोगा जिल्ह्याला सरकारकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत धर्मकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार देविंदरजीत सिंग लड्डी ढोस यांनी सरकारवर ताशेरे ओढळे. धर्मकोट विधानसभेत मागच्या तीन वर्षांपासून आरोग्याशी संबंधित एकही प्रकल्प पूर्ण केलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. एका बाजूला आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये आरोग्य व्यवस्था कशी बळकट केली, याचे दाखले देऊन पंजाबमध्ये सत्ता मिळवली. त्याच आम आदमी पक्षाला आता आरोग्याच्या प्रश्नावरून आपल्याच आमदारांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात आमदार ढोस यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. बलबीर सिंग यांना धर्मकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावाबाबत प्रश्न विचारला. या केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र सरकारकडून प्रस्तावच न आल्यामुळे ते नाराज झाले.

आम्ही पाकिस्तानात राहतो का?

धर्मकोट विधानसभेत ट्रॉमा सेंटर उभारण्याचाही प्रस्ताव आलेला नाही. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री म्हणाले की, पंजाबमध्ये आधीच पाच जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर सुरू आहेत. मंत्र्यांच्या या उत्तरानंतर आमदार ढोस चांगलेच संतापले. त्यांनी धर्मकोट हा मागास भाग असल्याचे सांगितले. तसेच ज्या जिल्ह्यात हा मतदारसंघ मोडतो, तो मोगा जिल्हा पंजाबचा भाग आहे का? की आम्ही पाकिस्तानात राहतो? असे सांगून सरकारवरच तोफ डागली.

मोगा जिल्ह्यावर अन्याय का?

आमदार ढोस म्हणाले, “आम्हीदेखील पंजाबमध्येच राहतो. मोगा जिल्हा पंजाबचा भाग आहे. सरकारकडून धर्मकोट विधानसभेसाठी एकही आरोग्याचा प्रकल्प दिलेला नाही. धर्मकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ एमबीबीएस डॉक्टरची गरज असताना त्याठिकाणी दोनच डॉक्टर आहेत. मोगा जिल्ह्याला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. काही काळापूर्वी ३०० डॉक्टर्सची भरती झाली. त्यापैकी मोगा जिल्ह्याला फक्त चार डॉक्टर मिळाले. एकूण २५५ डॉक्टर्सची गरज असताना मोगा जिल्ह्यात फक्त चार डॉक्टर काम करत आहेत. दुसरीकडे मलेरकोटला या छोट्याश्या जिल्ह्यात २८ डॉक्टर दिले आहेत. हा मोगा जिल्ह्यावर अन्याय नाही का?”

यानंतर आरोग्य मंत्र्यांनी धर्मकोट विधानसभेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या मतदारसंघाची लोकसंख्या २४ हजार इतकी आहे. सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि १० लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय स्थापन केले जाते. मोगा जिल्ह्याची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी आहे. तसेच धर्मकोट रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

आमदार ढोस यांच्याशिवाय शुतराणा येथील आमदार कुलवंत सिंग बाजीगर यांनीही त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सेवेशी संबंधित विषय मांडले. तसेच मोहालीचे आमदार कुलवंत सिंग यांनीही त्यांच्या मतदारसंघात स्थापलेल्या आरोग्य केंद्रावर पुरेसे कर्मचारी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जे कर्मचारी आहेत, ते वेळेवर रुग्णालयात उपस्थित नसतात, अशी तक्रार त्यांनी केली. यावर मंत्र्यांनी मान्य केले की, सकाळी ९ वाजेपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहिले पाहिजे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feel like we are living in pakistan aap mla devinderjeet singh laddi dhose puts own govt in dock kvg