एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी कथित अडथळा ठरलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडावी म्हणून सोलापुरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून त्याविरोधात सिध्देश्वर कारखाना बचाव कृती समितीनेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचने सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु सिध्देश्वर बचाव कृती समितीच्या आक्रमक प्रतिआंदोलनामुळे वातावरण तापत गेले आहे. यातच सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी सिध्देश्वर साखर कारखाना आणि सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांचा थेट नामोल्लेख टाळून पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या भेटीप्रसंगी गुन्हेगार म्हणून संबोधले.

त्यामुळे संतापलेले काडादी यांनी सोलापूर विकास मंचच्या आंदोलनस्थळी येऊन केतन शहा यांचा कडक शब्दात समाचार घेतला आणि खिशातून रिव्हाल्व्हर काढून दाखविले. त्यामुळे वातावरण तापत असतानाच काडादी यांच्या बाजूने प्रतिआंदोलनाचा जोर चढला आहे. यात सिध्देश्वर साखर कारखान्याचे हजारो सभासद शेतकरी व कामगारांसह सर्वपक्षीय नेते मंडळी काडादी यांच्या पाठीशी उभी आहेत.

विमानसेवेच्या नावाखाली सिध्देश्वर साखरा कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची कथित अडथळा ठरणारी ३०० मीटर उंच चिमणी पाडून टाकावी म्हणून होणाऱ्या आंदिलनाचा सूत्रधार कोण, याची प्रश्नार्थक चर्चा वीरशैव लिंगायत समाजात सुरू आहे. यात भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्याकडे बोट दाखविले जात आहे.वीरशैव समाजाची प्रमुख सत्तास्थाने असलेले ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थान समिती आणि सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना आदी प्रतिष्ठित संस्था पूर्वापार काडादी घराण्याच्या ताब्यात आहेत. याच समाजाच्या प्रतिष्ठित देशमुख घराण्यातील भाजपचे माजी मंत्री, आमदार विजय देशमुख यांचा धर्मराज काडादी यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष सर्वज्ञात आहे.

हेही वाचा: शेखर माने : सामाजिक भान असलेला कार्यकर्ता

विमानसेवा सुरू होण्यासाठी स्थानिक व्यापारी, उद्योजकांची मागणी आहे. त्यासाठी सोलापूर विकास मंचने आंदोलन छेडले असता त्यामागे आमदार विजय देशमुख यांचे छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. काडादी यांनी खिशातून रिव्हाल्व्हर काढून दाखविल्यानंतर त्याबद्दल केतन शहा यांना पोलिसांत फिर्याद देण्याचा सल्ला कोणी दिला होता, हेसुध्दा सर्वश्रूत आहे. अर्थात शहा यांनी काडादी यांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद देण्याचे धाडस दाखविले नाही, ही गोष्ट वेगळी. परंतु यानिमित्ताने काडादी व आमदार देशमुख यांच्यातील सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर येऊ घातला आहे.

सोलापूरची विमानसेवा जरूर सुरू व्हावी. पण त्यासाठी होटगी रस्त्यावर सिध्देश्वर कारखान्याजवळील जुन्या आणि अवघ्या ३५० एकर क्षेत्राच्या विमानतळाचा तात्पुरती विमानसेवा सुरू होण्यासाठी नको, तर शहराजवळच बोरामणी येथे नवीन आंतरराष्ट्रीय काॕर्गो विमानतळाची उभारणी सुरू आहे. सुमारे दोन हजार एकर क्षेत्रातील हे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी लवकर झाल्यास इकडे सिध्देश्वर साखर कारखानाही सुरक्षित राहू शकतो, असे काडादी यांचे म्हणणे आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीनेही याच प्रश्नावर आंदोलन हाती घेतले आहे.

हेही वाचा: माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांच्या पुतळा अनावरणास राज्यपालांचा नकार ?; विधानसभेत काँग्रेसचा आरोप

एकंदरीत बोरामणी विमानतळ आणि सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलेल्या विराट मोर्च्यात दोन्ही काँग्रेस, दोन्ही शिवसेना, भाजप, माकप, भाकपसह प्रहार संघटना, वीरशैव लिंगायत समन्वय समिती, वीरशैव लिंगायत महिला संघटना, शेतकरी संघटना यासह अन्य अनेक संघटना उतरल्या होत्या. या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले असताना त्यात सर्वांनीच आमदार विजय देशमुख यांच्या नावाचा उल्लेख टाळून, त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व शिवशरण पाटील यांच्यासह आमदार देशमुख यांचे पक्षांतर्गत मतभेद असलेले महापालिकेतील माजी सभागृहनेते, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील हे काडादी यांना साथ देत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: राज्यसभेला शाळा बनवू नका, सभागृह कसे चालवायचे तुम्ही मला सांगणार का?, सभापती धनखडांची सदस्यांना सज्जड समज

आमदार विजय देशमुख हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपकडून सलग चौथ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची शहरातील भाजपवर मजबूत पकड आहे. स्वतःच्या लिंगायत समाजातही त्यांचा प्रभाव आहे. परंतु समाजानेच आता नेतृत्व बदलण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रसंगी मैदानात उतरण्याची आपली तयारी असल्याचे जाहीर करीत धर्मराज काडादी यांनी आमदार देशमुख यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानिमित्ताने सर्वपक्षीय मंडळींनी काडादी यांना समाजाच्या नेतृत्वासाठी आखाड्यात उतरण्यासाठी ताकद उभी केल्याचे दिसून येते. काडादी यांचा आक्रमक पवित्रा सोलापूरकरांनी अनुभवला आहे.ते जर उघडपणे मैदानात उतरले तर आमदार देशमुख यांची मोठी कोंडी होण्याची आणि त्यातून स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात शेवटी सत्ताधारी भाजपची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे.

Story img Loader