संतोष मासोळे, लोकसत्ता
धुळे: राष्ट्रवादीतील फुटीने स्थानिक राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असून शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांमध्ये विभागलेल्या गटात नेमकी संधी साधण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. अजितदादांच्या गटात संघटनात्मक पदे मिळविण्याच्या इर्षेने काही नवखे बोहल्यावर चढले आहेत. त्यामुळे दादांवर निष्ठा बाळगून आजवर पक्षात काम करणाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अकस्मात दाखल झालेल्या नवोदितांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पक्ष संघटना मजबूत राखण्यासाठी नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. केवळ एखाद्या नेत्याच्या छत्रछायेखाली आपले इप्सित साध्य करणारे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी दोन गटात विभागले गेले आहेत. माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख, डॉ. देशमुख यांचे भाऊ दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, किरण शिंदे आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी या सर्वांनीच आता अजित पवार गटाची वाट धरली. या गटाने नुकतेच कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन केले. वरिष्ठ नेत्यांप्रमाणे मेळाव्यात ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार हेच आपले नेते असल्याची भावना मांडत दोन्हीकडे समांतर भूमिका ठेवण्याचे कसब साधण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा-जयंत पाटील यांना मतदारसंघातच भाजपचे आव्हान
अजितदादांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळ्यातील कार्यालय ताब्यात घेण्याचा मनसुबा प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागिरदार यांनी जाहीर केला. त्यास शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी जशास तसे उत्तर देत त्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. अशा काही घटनांमधून दोन्ही गटातील धुसफूस उघड होत आहे.
पक्षफुटीमुळे अनेकांना पदांचे वेध लागले आहेत. माजी आमदार अनिल गोटे यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणवून घेणारे सारांश भावसार यांनी अजितदादा गटातर्फे घोषित होऊ शकणाऱ्या शहराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे भावसार यांचे नेते गोटे यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मध्यंतरी गोटे यांनी शरद पवार यांची थेट भेट घेत पक्षाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दुसरीकडे सारांश भावसार या गोटे यांच्या समर्थकावर अजित पवार यांच्या नेतृत्वाने भुरळ घातली आहे. विद्यमान शहराध्यक्ष रणजित भोसले हे शरद पवार गटातच असल्याने अजित पवार यांच्या गटाला नवीन चेहरा शोधावा लागत आहे. हा धागा पकडत भावसार यांनी आपण अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय चळवळीत सहभागी असल्याचे सांगत दादांनी संधी दिल्यास धुळे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू असे म्हटले आहे. अजितदादा गटाकडून शहराध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, असे इरादे त्यांनी व्यक्त केल्याने दादांवर निष्ठा राखणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
आणखी वाचा-‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची उद्धव ठाकरे यांना संधी
इर्षाद जहागिरदार यांच्यासारखे दादांचे कट्टर समर्थक असताना नवख्यांना संधी कशी मिळेल, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. भावसार यांचे दावे हास्यापद ठरवित टीका होत आहे. भावसार यांचा आजवर पक्ष कार्याशी फारसा संबंध नव्हता. फूट पडण्याआधीच जहागीरदार यांनी पक्षाची मोट बांधली. पाणी टंचाईच्या काळात १०० हून अधिक विंधन विहिरींचा शुभारंभ केला. अनेक वॉर्डातील पाणी टंचाईवर मात करीत प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले. असे असतांना राजकीय मैदानात अकस्मात उडी घेणार्या लोकांची पवार काका-पुतण्या पैकी कुठल्याही गटाने नवा पदाधिकारी म्हणून नियुक्ती केल्यास दोन्ही गटातील निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.