चंद्रपूर : राजुरा या कुणबीबहुल मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि भाजपचे देवराव भोंगळे, या तीन कुणबी उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. या मतदारसंघातील आदिवासी समाजाची गठ्ठा मते निर्णायक भूमिका बजावणार आहे. भाजपचे माजी आमदार ॲड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलंगणा व मराठवाडा या दोन प्रांतांच्या सीमेवर वसलेल्या या मतदारसंघात राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती या चार तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. त्यानंतर आदिवासी समाजाची सर्वाधिक मते आहेत. काँग्रेसने खैरे कुणबी समाजातून येणारे आमदार धोटे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. चटप व भोंगळे धानोजे कुणबी समाजातून येतात. चटप सहाव्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. भाजपने यावेळी नव्या दमाचा युवा चेहरा भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भोंगळे यांच्या उमेदवारीला भाजपच्याच दोन्ही माजी आमदारांनी विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केले आहेत.

हेही वाचा – पक्षांतर केल्यावरही राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी का ?

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाचे चटप यांनी १९९०, १९९५ व २००४ असे तीन वेळा प्रतिनिधित्व केले. मात्र त्यांनी दोन लोकसभा व तीन विधानसभा निवडणुकीत पराभवदेखील बघितला आहे. काँग्रेसचे आमदार धोटे यांच्याही पाठीशी विजय व पराजय, असे दोन्ही अनुभव आहेत. तुलनेत भाजपचे भोंगळे या मतदारसंघासाठी नवखे आहेत. यामुळे त्यांना स्थानिक मतदार स्वीकारतील का, हा प्रश्न आहेच, तर संजय धोटे आणि निमकर काय भूमिका घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आदिवासी नेते गोदरू पाटील जुमनाके यांचा मुलगा गजानन गोदरू पाटील जुमनाके हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदिवासी मतदार जुमनाके यांच्या पाठिशी उभा राहिला तर काँग्रेसच्या धोटे यांच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. ही आमची शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहन धोटे व चटप यांच्याकडून केले जात आहे. धोटे, चटप आणि भोंगळे या तीन कुणबी उमेदवारांपैकी यंदा कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – नवीन समीकरणे राजू शेट्टी यांना फायदेशीर ठरणार का ?

आतापर्यंतचे विजयी उमेदवार

१९६२ – विठ्ठलराव धोटे

१९६७ – श्रीहरी जीवतोडे

१९७२ – विठ्ठलराव धोटे

१९७७ – बाबुराव मुसळे

१९८० – प्रभाकर मामुलकर

१९८५ – प्रभाकर मामुलकर

१९९० – ॲड. वामनराव चटप

१९९५ – ॲड. वामनराव चटप

१९९० – सुदर्शन निमकर

२००४ – ॲड. वामनराव चटप

२००९ – सुभाष धोटे

२०१४ – ॲड. संजय धोटे

२०१९ – सुभाष धोटे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting between three kunbi candidates in rajura who will win live fight of subhash dhote vamanrao chatap devarao bhongle print politics news ssb