तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाच्या सरकारविरोधात भाजपाने मंगळवारी (दि. २५ जुलै) राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील गरीब आणि बेघर नागरिकांना दोन बीएचकेचे घर देऊ असे आश्वासन बीआरएस सरकारने दिले होते, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत भाजपाने आंदोलन पुकारले आहे. तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री (ईशान्य भारत विभाग) जी. किशन रेड्डी म्हणाले की, आम्ही राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असून निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याबद्दल प्रश्न विचारणार आहोत.

“राज्यातील सरकारला आता नऊ वर्ष होऊन गेली आहेत. निवडणुकीआधी त्यांनी गरीब आणि बेघर लोकांना दोन बीएचकेचे घर देऊ असे आश्वासन दिले होते, ते हवेतच विरले. राज्यात घरांची मोठी मागणी आहे, अशातच जी काही थोडीथोडकी घरे बांधून झाली आहेत, त्याचे वाटप करण्यात आलेले नाही. सरकारच्या अशा वागण्यातून त्यांची बेफिकिरी दिसून येते”, अशी टीका करताना किशन रेड्डी म्हणाले यांनी सांगितले की, ते उद्या (दि. २५ जुलै) हैदराबादमधील धरणा चौक येथे आंदोलनासाठी जमणार आहेत. तसेच प्रदेश संघटनेच्यावतीनेही राज्यभरात जिल्हा-जिल्ह्यात आंदोलन घेतले जाणार आहे. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पात्र असूनही ज्यांना घरे मिळाले नाहीत असे सामान्य नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक पवित्रा घेण्यासाठी बीआरएसने मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायाला दिलेली आर्थिक मदत कारणीभूत ठरली आहे. रविवारी (दि. २३ जुलै) बीआरएस सरकारने जाहीर केले की, राज्यातील मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायालाही एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. ही योजना ७ जून रोजी राज्यातील मागासवर्गीय समाजासाठी सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबातील एका व्यक्तिला रुपये एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायाच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एक लाखांची आर्थिक मदत देण्याचा शासन काढला आहे. या निर्णयावर टीका करताना भाजपाने केसीआर यांच्यावर मतदारांना आमिष दिल्याचा आरोप केला आहे. सरकारी योजनेच्या माध्यमातून केसीआर समाजातील काही घटकांना लाच देत आहेत, अशी टीका करण्यात आली. करदात्यांच्या पैशांचे समाजाच्या विविध गटातील मतदारांना वाटप करून त्यांची मते एकप्रकारे विकत घेण्याचा निर्लज्ज प्रकार सरकाच्या माध्यमातून सुरू असून आम्ही याचा निषेध करतो. जनतेच्या पैशांची केसीआर होळी करत आहेत, अशी टीका भाजपा नेते के. क्रिष्णा सागर राव यांनी केली.

फक्त मुस्लीम समाजच का? निवडणुकीपूर्वी बीआरएस सरकार असे भ्रष्ट निर्णय कसे काय घेऊ शकते? हा सार्वजनिक भ्रष्टाचार नाही तर काय आहे? असे संतप्त प्रश्न के. क्रिष्णा सागर यांनी उपस्थित केले.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते के. क्रिष्णा सागर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री केसीआर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहीजे, त्यांचे निवडून आलेले सरकार हे सरकारी तिजोरीचे पालक आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी बिनदिक्कतपणे भिक्षा वाटायला ते काही राजा नाहीत. विधानसभा निवडणूक अगदी जवळ आलेली असताना राज्य सरकारकडून अनैतिक, अन्यायकारक आणि भ्रष्ट अशी योजना राबविली जात आहे. याबद्दल मुख्यमंत्री केसीआर आणि बीआरएस पक्षाची राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत.”