बंगळुरूमधील रामेश्वर कॅफे येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणावर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. शोभा करंदलाजे यांची दक्षिणेकडील फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख आहे. भाजपा संसदीय मंडळाचे सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विश्वासू मानल्या जाणार्‍या, करंदलाजे सध्या उडुपी-चिकमंगळूरच्या खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना बंगळुरू उत्तरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. करंदलाजे यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ‘गो बॅक शोभा’ असा नारा देत निदर्शने केल्यानंतर, त्यांना नवीन जागेवरून उमेदवारी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करंदलाजे यांचे वादग्रस्त विधान

बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणावर बोलताना करंदलाजे म्हणाल्या, “राज्यातील (कर्नाटक, काँग्रेसची सत्ता) कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. तामिळनाडूचे लोक येतात आणि बॉम्ब ठेवतात.” त्यांनी अनेक घटनांचा संदर्भ दिला. “दिल्लीहून लोक येतात आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतात (काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदाराने शपथविधीदरम्यान लावलेल्या कथित घोषणांचा संदर्भ घेत). केरळचे लोक येऊन तरुणीवर ॲसिड टाकतात, काही लोक हनुमान चालिसा वाचल्यास मारहाण करतात”, असे त्या म्हणल्या. मंगळवारी करंदलाजे यांनी भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि पीसी मोहन यांच्यासमवेत अजानदरम्यान हनुमान चालिसा वाजवल्याबद्दल एका दुकानदारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध आंदोलनात हजेरी लावली.

शोभा करंदलाजे यांनी आजवर केलेले वादग्रस्त वक्तव्य

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील एका महत्त्वाच्या राजकीय नेत्याविरुद्ध निवडणूक आयोगाने केलेली ही पहिलीच कारवाई आहे. मदुराई पोलिसांनी करंदलाजे यांच्यावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुता वाढवल्याबद्दलही गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि इतर डीएमके नेत्यांनी तीव्र टीका केली आहे.

जुलै २०२१ मध्ये जेव्हा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यात आले, तेव्हा करंदलाजे यांनी त्यांच्या ट्विटर (आताचे एक्स)वरील सर्व जुन्या पोस्ट डिलिट केल्या होत्या. यातील अनेक पोस्ट कथित गोहत्या आणि लव्ह जिहादसारख्या घटनांवर होत्या.

ऑक्टोबर २०१७ मध्ये, विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी, करंदलाजे यांनी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील परेश मेस्ता यांच्या मृत्यूवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. ही जातीयवादी हत्या असल्याचे सांगत त्यांनी असा दावा केला होता की, हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या वक्तव्यामुळे परिसरात जातीय तणाव वाढला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने २०२१ मध्ये मेस्टा यांचा मृत्यू बुडाल्याने झाल्याचे सांगितले. करंदलाजे यांच्यावर खोटी माहिती ट्विट करून अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. २०२३ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने हा खटला मागे घेतला.

जानेवारी २०२० मध्ये मलप्पूरम जिल्ह्यातील अनेक हिंदू कुटुंबांना नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे (सीएए) समर्थन केल्याबद्दल पाणी नाकारले जात आहे, असा दावा केल्यावर केरळ पोलिसांनी करंदलाजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मलप्पूरम हा केरळमधील मुस्लिमबहुल प्रदेश आहे. दुसऱ्या वेळी मलप्पूरममध्ये फटाक्याने भरलेले अननस खाल्ल्यानंतर हत्तीच्या मृत्यूने करंदलाजे यांनी जिल्ह्याचे वर्णन ‘जिहादी स्थळ’ असे केले होते. केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या वादात त्यांनी अनेक वादग्रस्त ट्विटही केले होते.

हेही वाचा : केजरीवाल, लालू ते जयललिता; आतापर्यंत ‘या’ ५ मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

कोण आहेत शोभा करंदलाजे?

करंदलाजे या कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वोक्कीलिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. १९९७ मध्ये त्यांची उडुपी जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. २००० मध्ये त्यांची भाजपा प्रदेशच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. २००८ मध्ये बंगळुरूमधील यशवंतपूर जागेवर त्या विजयी झाल्या. भाजपाने त्यांना २०१४ मध्ये उडुपी-चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी ही जागा जिंकली. २०१९ मध्ये पुन्हा त्या याच जागेवरून निवडून आल्या.