स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं शनिवारी (०५ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात निधन झालं. १०५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेगी यांचं आपल्या राहत्या घरात वृद्धापकाळाने निधन झालं. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी २ नोव्हेंबर रोजीच टपालद्वारे मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मतदान करण्याची त्यांची ही ३४ वी वेळ होती.
श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार?
१०५ वर्षीय श्याम सरन नेगी यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा मतदान केलं होतं. १९५१-५२ सालच्या भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान, भौगोलिक कारणांमुळे किन्नौर येथे काही महिने आधीच मतदान घेण्यात आलं. कारण हा जिल्हा समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर आहे. त्यामुळे हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, अशा स्थितीत या जिल्ह्यात मतदान प्रक्रिया राबवणं कठीण झालं असते, त्यामुळे इतर ठिकाणांच्या तुलनेत हिमाचल प्रदेशातील किन्नोर याठिकाणी काही महिने आधीच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
या निवडणुकीत श्याम सरन नेगी यांनी सर्वात आधी मतदान केलं. त्यामुळे ते स्वतंत्र भारतातील पहिले मतदार बनले. त्यावेळी त्यांचं वय ३४ वर्षे होतं. त्यांनी किन्नोर जिल्ह्यातील कल्पा येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. १ जुलै १९१७ रोजी नेगी यांचा जन्म झाला असून त्यांनी प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकीत मतदान केलं आहे, असा दावा त्यांनी स्वत: केला आहे.
हेही वाचा- आधी 26 नेत्यांचा राजीनामा, आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही ठरेना; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस अडचणीत?
नेगी यांच्या मृत्यूनंतर देशभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. नेगी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करताना मोदी जाहीर सभेत म्हणाले, “दिल्लीहून येत असताना मला श्याम सरन नेगीच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या मृत्यूआधीच या निवडणुकीतही (हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक-२०२२) मतदान केलं आहे. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपली जबाबदारी पार पाडली. हा सर्व तरुणांसाठी बहुमोल संदेश आहे. त्यांच्या अभूतपूर्व कामासाठी मी नेगी यांना वंदन करतो आणि त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.”
हेही वाचा- भारत जोडो यात्रा ही राजकीय हुकूमशाहीविरोधातील लढाई; जयराम रमेश यांची मोदीनीतीवर टीका
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही नेगी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत १०५ वर्षीय नेगी यांनी ३४ व्यांदा मतदान केलं आहे, अशी माहिती जयराम ठाकूर यांनी दिली.