१४व्या विधानसभेच्या तीन वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत पाच आमदारांचे निधन झाले आहे. चार मतदारसंघांत झालेल्या पोट निवडणुकांमध्ये तीन मतदारसंघांत मृत आमदारांचे कुटुंबियच पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. पुण्यातील कसबा पेठ मतदार – संघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे शुक्रवारी निधन झाले. ऑक्टोबर २०१९ मध्ये १४व्या विधानसभेची निवडणूक झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत पाच विद्यमान आमदारांचा मृत्यू झाला आहे.
पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भालके यांच्या पुत्राचा पराभव झाला. भाजपने ही जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र निवडून आले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जाधव यांच्या पत्नी निवडून आल्या.
हेही वाचा: पुणे: आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्ययात्रेसाठी मध्य भागात वाहतूक बदल
अंधेरी मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत लटके यांची पत्नी निवडून आली. अंधेरेची पोटनिवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली होती.