लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना समाजवादी पक्षातील महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जात आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पाच वेळा खासदार राहिलेल्या सलीम शेरवानी यांनीही समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सलीम शेरवानी यांनी अखिलेश यादव यांना पत्र लिहित आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. या पत्रात त्यांनी अखिलेश यादव हे पीडीए अर्थातच मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समुदायाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये एकही मुस्लीम नाव नाही. त्यामुळे मुस्लीम समाजाचा समाजवादी पक्षावर असलेला विश्वास कमी झाला आहे, असेही ते म्हणाले.
याबरोबरच समाजवादी पक्ष आणि मुस्लिमांमधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाच्या परंपरेनुसार मी तुम्हाला राज्यसभेतील जागांपैकी एक जागा मुस्लीम समाजाच्या उमेदवाराला देण्याची विनंती केली होती. मात्र, जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये एकही मुस्लीम नाव नाही. यामुळे समाजवादी पक्ष भाजपापेक्षा वेगळा कसा? असा प्रश्नही त्यांनी अखिलेश यादव यांना विचारला आहे.
“विरोधी पक्ष एक मजबूत विरोधी आघाडी निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे, त्याबद्दल कोणीही गंभीर नाही. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याऐवजी आपआपसातच भांडणं करत आहेत. धर्मनिरपेक्षता हे केवळ ढोंग बनले आहे. भारतातील मुस्लिमांनी समानता, आदर आणि त्यांचे हक्क याशिवाय दुसरे काहीही मागितले नाही; पण समाजवादी पक्षाला ही मागणी खूप जास्त वाटत आहे. त्यामुळे या पक्षात राहून मी मुस्लिमांसाठी काम करू शकेन असे वाटत नाही, म्हणून मी पक्षाचा राजीनामा देत आहे”, असेही ते म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्याभरात पक्ष सोडणारे सलीम शेरवानी हे दुसरे नेते आहेत. यापूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा दिला. समाजवादी पक्षात त्यांना अपमानित केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आमदार पल्लवी पटेल यांनीही समाजवादी पक्षाचा राजीनामा देत अपना दलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्या शनिवारी अपना दलच्या झेंड्यासह वाराणसीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेतही दिसून आल्या.
उत्तर प्रदेशात २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. समाजवादी पक्ष यापैकी तीन जागा जिंकण्याची शक्यता आहे. यासाठी समाजवादी पक्षाने माजी मुख्य सचिव आलोक रंजन, अभिनेत्या जया बच्चन आणि रामजी लाल सुमन यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी आलोक रंजन आणि अभिनेत्या जया बच्चन या कायस्थ आहेत, तर रामजी लाल सुमन हे दलित समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात.
दरम्यान, सलीम शेरवानी हे बदायूंमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश केला. ते चार वेळा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर, तर एकदा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले.
या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शेरवानी म्हणाले, “राज्यसभेसाठी माझे नाव नसल्याने मी राजीनामा दिला आहे, असा अर्थ कोणीही लावू नये. अखिलेश यादव यांनी ज्यावेळी मुस्लीम नेते जावेद अली यांना राज्यसभेत पाठवले, तेव्हा मी त्याचे समर्थन केले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एका मुस्लीम समाजाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याची संधी होती, पण त्यांनी तसे केले नाही.”
हेही वाचा – ”३७० जागा जिंकणं श्यामाप्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली”; पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?
दरम्यान, समाजवादी पक्ष हा मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक समुदायाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या आरोपावर अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया दिली. ”भविष्यात राज्यसभेच्या अनेक जागा रिक्त होणार आहेत, त्यामुळे केवळ राज्यसभेच्या एका जागेमुळे पीडीएची लढाई कमकुवत होईल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात समाजादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनीही प्रतिक्रिया दिली. “पीडीए समुदायांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तथ्यहीन आहे. राज्यसभेसाठी तीन उमेदवारांमध्ये एक दलित आहे. गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मुस्लीम नेते जावेद अली यांना उमेदवारी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या एमएलसी निवडणुकीतही आम्ही मुस्लिमांना विधान परिषदेवर पाठवले. त्यामुळे पीडीएकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच येत नाही”, असे ते म्हणाले.