तेलंगणा विधानसभा निवडणुका यावर्षी डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने शेजारच्या तेलंगणा राज्यात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप जाहीरनामा तयार झाला नसला तरी पक्षाच्या नेत्यांकडून विविध कल्याणकारी योजना सूचविण्याकडे कल दिसत आहे. जेणेकरून कर्नाटकप्रमाणेच तेलंगणातही सत्ता प्राप्त करता येईल.
तेलंगणा प्रदेश काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विविध जिल्ह्यांच्या दौरा करून लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांना काय अपेक्षित आहे, याचा अंदाज घेऊन काही योजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरगुती स्वयंपाक सिलिंडरसाठी ५०० रुपयांचे अनुदान, पिक गुंतवणूक मदत योजनेंतर्गत प्रति एकर १५ हजारांची मदत, यामध्ये भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश असणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाकडून सध्या पिक गुंतवणूक मदत योजनेंतर्गत प्रतिएकर पाच हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. यामध्ये भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश नाही. बेरोजगार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना महिना ४ हजार रुपयांचा भत्ता देण्याचाही विचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांग्रेस पक्ष मंडळ अध्यक्ष, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तेलंगणा प्रदेश कार्यकारिणी, राजकीय व्यवहार समितीचे संयोजक, माजी मंत्री मोहम्मद अली शब्बीर यांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकांमधून तेलंगणा राज्यात सत्ता मिळवण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात येत आहे. पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचे आश्वासन देण्यावर काँग्रेसचा भर दिसतो. दोन लाखांपर्यंतचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, इंदिराम्मा गृह योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी रुपये पाच लाखांची मदत आणि राजीव आरोग्य योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे रकमेचे मोफत उपचार देण्यासंबंधीच्या योजनांवर चर्चा झाली.
काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्या पुढाकारातून आणि महत्त्वाच्या सूचनाच्या माध्यमातून काँग्रेसचा जाहीरनामा तयार होत आहे. विक्रमार्क यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यव्यापी पदयात्रा काढली होती. विक्रमार्क यांनी पदयात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या. विक्रमार्क यांच्या महत्त्वाच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्ष जाहीरनामा तयार करण्याचे काम करत आहे. यासोबतच काँग्रेसने राज्यभरात केलेल्या सर्व्हेचाही आधार घेण्यात येत आहे. तसेच कर्नाटकमध्ये ज्याप्रकारे विविध आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्यात आले, त्याप्रमाणे इतरही आश्वासने देण्यात येणार आहेत, अशी माहिती तेलंगणा प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांनी दिली.
काँग्रेस नेते कोदंदा रेड्डी म्हणाले की, विक्रमार्क यांनी तेलंगणाच्या ग्रामीण भागातील जनतेची महत्त्वाची मागणी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. बीआरएस सरकारने जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी धरणी पोर्टलची व्यवस्थापन सुविधा निर्माण केली होती, मात्र या सुविधेला ग्रामीण जनता कंटाळली आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या पोर्टलमध्ये बरेच बदल केले जातील. तर शब्बीर अली म्हणाले की, मंडळ अध्यक्षांना ग्रामीण भागाचा दौरा करण्यास सांगितले असून प्रस्तावित योजनांची माहिती देण्यास सांगितले आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास या प्रस्तावित योजना लागू केल्या जातील, असेही आश्वासन जनतेला देण्यात येत आहे.
आणखी वाचा >> कर्नाटकनंतर काँग्रेसचा मोर्चा तेलंगणाकडे; भाजपाने केलेली चूक करणार नाही, मुख्यमंत्री केसीआर यांची ग्वाही
काँग्रेसचा जाहीरनामा, तसेच प्रस्तावित योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यासाठी तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीने गाव, प्रभाग, मंडळ आणि विधानसभा क्षेत्रानुसार संयोजक नेमण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ११९ विधानसभा मतदारसंघापैकी ८५ मतदारसंघातील मंडळात अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाने केलेल्या या नियुक्त्यांमुळे तळागाळातील नेत्यांमध्ये असंतोष खदखदत असून काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनही केले. आंदोलक कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी रेवंथ रेड्डी, राज्याचे उपाध्यक्ष मल्लू रवी, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी हस्तक्षेप केला.