प्रबोध देशपांडे
सांगवी (अकोला) : कुठल्याही मुद्द्यावर आंदोलन हा मार्ग नाही. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी मांडलेले मत विरोधकांना पटले नसल्यास चर्चेसाठी समोर यावे, असे मत काँग्रेस नेते व माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
हेही वाचा… राहुल गांधींची यात्रा भारतीय राजकारणावर प्रभाव टाकेल, तेलंगणातील महिला उद्योजिकेचा विश्वास
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान मनसेने राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्द्यावर आंदोलन हा मार्ग नसल्याचे सांगितले. मनसे आंदोलन करणार असल्याची मला कल्पना नाही. त्यांना राहुल गांधी यांनी मांडलेले मत योग्य वाटत नसल्यास त्यांनी चर्चेसाठी समोर यावे, त्यांचा मुद्दा आम्हाला पटवून द्यावा, असे त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून लाखोंच्या संख्येने ते सहभागी होत आहेत. उद्या देखील ही यात्रा अशाच उत्स्फूर्तपणे सुरू राहील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… केदार साठे : संस्थात्मक कामातून संघटनेला बळ
राहुल गांधींची कॉर्नर सभा रद्द
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सांगवी येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही सभा आयोजकांनी ऐनवेळी रद्द केली.