कर्नाटकमधून राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना होती. पण पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. २०१८ च्या विधासभा निवडणुकीपूर्वी विजयेंद्र यांना दक्षिण कर्नाटकमधील वरुणामधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यांना तसे प्रोजेक्टही केले जात होते. तेव्हा काँग्रेसचे त्यावेळचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हा मतदार संघ होता. 

येडियुरप्पा यांचा मजबूत वारसदार

आता ४५ वर्षांचे असलेल्या विजयेंद्र यांना त्यावेळी कर्नाटकमधील भाजपाची शक्ती आणि येडियुरप्पा यांचा मजबूत वारसदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांची मागणी फेटाळली आणि त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले. येडियुरप्पा यांच्यासारख्या क्षेत्रीय दबदबा असलेल्या राजकारणातून बाहेर पडून संघटनात्मक राजकारणाची सुरुवात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण विजयेंद्र यांच्या समर्थकांनी हा निर्णय सहज स्वीकारला नाही. त्यांनी हॉटेलमध्ये भाजपाचे नेते राहिले होते त्या मैसूर हॉटेलच्या बाहेर निदर्शने केली. पण त्याचा पक्ष नेतृत्वावर फारसा परिणाम झाला नाही. 

२०१८ ला विजयेंद्र यांना विधानसभेचे तिकीट नाकरल्यानंतर भाजपात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत घरणेशाही टाळण्याची भूमिका अधिक ठळकपणे मांडली गेली. नुकतीच विजयेंद्र यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकरण्यात आली. त्याचे प्राथमिक कारण घराणेशाही टाळणे हेच होते.

दिल्लीत तळ

भाजपातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी विजयेंद्र विधानपरिषदेवर जाऊन राज्य मंत्रिमंडळात प्रवेश करण्याचा गांभीर्याने प्रयत्न करत होते. मात्र पक्षाच्या घराणेशाही नाकरण्याच्या भूमिकेमुळे त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे माहिती असूनसुद्धा ते चार दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. येडियुरप्पा यांचे मोठे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र हे शिमोगाचे खासदार असून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आहेत. त्यांच्याप्रमाणेच विजयेंद्र यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश होईल असा प्रयत्न होता. दोन वेळा नकार मिळाल्यावर २०२३ मध्ये येडियुरप्पा यांनी निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेतला तरच विजयेंद्र यांचा क्रमांक लागू शकतो. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने विजयेंद्र यांना सतत प्रोत्साहन दिले असून ते भविष्यात पक्षात मोठी भूमिका बजावतील असे भाजपाच्या जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमासाठी अमित शहा तुमकुर येथे आले होते, तेव्हा त्यांनी विजयेंद्र यांची स्तुती देखील केली होती. 

“मी राजकारणात आल्यापासून पक्ष आणि पक्ष नेतृत्वाने मला प्रोत्साहनच दिले आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की फक्त आणि फक्त सत्ता हे राजकारणात अंतिम ध्येय नसते”, असं म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयेंद्र यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader