संजीव कुळकर्णी
नांदेड : सुमारे २० वर्षांपूर्वी डॉ.अभय बंग यांनी हृदयरोग आणि जीवनशैली या व्याख्यानातून नांदेडकरांना रामप्रहरी चालण्याचा मंत्र दिला होता. त्यानंतर आता भारत जोडो यात्रेच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही चालण्याचा सराव सुरू केला असून यात्रेच्या महाराष्ट्र आगमनापूर्वी काँग्रेसने आम जनतेला ‘मी पण चालणार’ या घोषवाक्यासह यात्रेत सहभागी होण्याची साद घातली आहे!
खासदार गांधी यांची लक्षवेधी यात्रा पुढच्या सोमवारी (दि.७) जिल्ह्यातील देगलूर शहरात दाखल होत असून चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठा समूह भारतयात्रींच्या जिल्ह्यातील प्रवास आणि मुक्कामाच्या नियोजनामध्ये गुंतलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही तयारी चाललेली असताना, यात्रेकरूंच्या मार्गावर सामान्य जनतेनेही आपल्या क्षमतेनुसार चालावे, यासाठी संयोजकांचे प्रयत्न सुरू असून लोकांना यात्रेकडे आकृष्ट करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे.
हेही वाचा… लोकसभेच्या तयारीसाठी डॉ.कराड यांच्याकडून मिश्र दळणवळणाचे इंजिन
राहुल यांच्या यात्रेचा जिल्ह्यातील पहिला टप्पा ८ तारखेला देगलूर येथून सुरू होईल. या यात्रेत भारत यात्रींसोबत चालता यावे म्हणून अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपासून चालण्याचा सराव सुरू केल्याचे सांगण्यात आले. ते आणि त्यांचे काही सहकारी आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले आणि चैतन्यनगर वसाहतीलगतच्या महादेव मंदिरापासून विमानतळापर्यंत चालत गेले. बुधवारीही त्यांनी हा परिपाठ कायम राखला.
हेही वाचा… पुण्यात दोन दादांची वर्चस्वाची लढाई सुरू; अजितदादा आणि चंद्रकांतदादा आमने-सामने
नांदेड शहर आणि अन्यत्रही सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मनपाच्या उद्यानात सकाळी चालणार्यांची मोठी गर्दी असते. मागील काही वर्षात मुस्लिम महिलांमध्येही चालण्याच्या बाबतीत जागृती दिसून येते. पुरूष-महिला, युवक-युवती या सार्यांनी सकाळी ३० ते ४० मिनिटं चालले पाहिजे, हा मंत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी २००१ साली आपल्या व्याख्यानातून नांदेडकरांना दिला होता. त्यानंतर वेगवेगळ्या भागात चालणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. आता राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने चालण्याचा मंत्र ग्रामीण भागापर्यंत गेला आहे. काँग्रेसची ‘मी पण चालणार’ ही घोषणाही लक्षवेधी बनली आहे.
हेही वाचा… पंकज गोरे – रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता
काँग्रेसने यात्रेसाठी तयार केलेल्या घोषवाक्याचे अनावरण मंगळवारी झाले. यानिमित्ताने मित्रपक्षांच्या स्थानिक पदाधिकार्यांना आमंत्रित करण्याची दक्षता अशोक चव्हाण यांनी घेतली. खा.गांधी यांची यात्रा कर्नाटक राज्यात असताना, जनता दलाच्या तेथील नेत्यांनी यात्रेकडे पाठ फिरवली; पण नांदेड जिल्ह्यात यात्रेच्या स्वागतात राज्य जनता दलाचे नेते सहभागी होणार असल्याचे अॅड्.गंगाधर पटने यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), भाकप, पीरिपा आदी मित्रपक्षांचेही नेते यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षासोबत एकवटल्याचे समोर येत आहे.
खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून व प्रत्यक्ष सहभागातून निघालेल्या भारत जोडो यात्रेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य लोक या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पुढच्या टप्प्यात या यात्रेला लोकचळवळीचे स्वरूपा प्राप्त होईल. तसेच एकंदर प्रतिसाद पाहता ही यात्रा देशात एक नवा इतिहास घडवेल, असा विश्वास काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केला. चव्हाण यांनी बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमवेत यात्रा काळातील सुरक्षा व बंदोबस्तासंबंधी सविस्तर चर्चा केली.