रत्नागिरी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने संघटन बळकट करण्यावर जोर दिला आहे. . जिल्ह्यात भाजपचे तुलनेने कमी असलेले वर्चस्व येणा-या निवडणूकांमध्ये वाढविण्यासाठी भाजप पक्षाच्या नेत्यांनी सर्वात पहिले रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदार संघासाठी भाजपाने रत्नागिरी तालुक्यात तीन तालुकाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात भाजपा पक्षाची ताकद शिवसेनेच्या तुलनने खुपच कमी आहे. मात्र येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेवून भाजपाने रत्नागिरीमध्ये आपले वर्चस्व वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सर्व प्रथम शिवसेना आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असलेल्या रत्नागिरी मतदार संघा पासूनच भाजप नेत्यांनी पक्षाची ताकद वाढविण्याचा विचार केला आहे. भाजपाने रत्नागिरी तालुक्यात संघटनात्मक वाढीसाठी ३ तालुकाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रत्नागिरी तालुक्यात भाजपाचे दक्षिण आणि उत्तर असे दोन तालुकाध्यक्ष कार्यरत होते. मात्र त्यात आता मध्य रत्नागिरी तालुकाध्यक्ष पद वाढविण्यात आले आहे. रत्नागिरीच्या शहराध्यक्षासह तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची यादी तयार करुन ती यादी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली आहे.

भाजपाने नवीन तालुकाध्यक्षाच्या कारभारासाठी दक्षिण तालुक्यातील पाली, हरचेरी, पावस, गोळप, मध्य तालुक्यात करबुडे, मिरजोळे, नाचणे, खाडीपट्टा तर उत्तर रत्नागिरी तालुक्यासाठी शिरगाव, वाटद, कोतवडे गटांचा समावेश केला आहे. पहिल्या नियोजनात एका संपुर्ण तालुक्याच्या अध्यक्ष पदाची विभागणी करुन आता मध्य, दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी असे तीन तालुका अध्यक्ष पदे निर्माण करण्यात आली आहेत.

भाजपामध्ये होणारा हा बदल लवकर दिसून येणार असल्याने या तिन्ही तालुकाध्यक्ष पदासाठी आता इच्छुकांची देखील संख्या वाढली आहे. यामध्ये दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदासाठी दादा दळी, पिंट्या निवळकर, सचिन आचरेकर तर उत्तर रत्नागिरीसाठी विवेक सुर्वे, बापू गवाणकर तर नव्याने निर्माण होणाऱ्या मध्य रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदासाठी प्रतिक देसाई, मिथुन निकम, ओंकार फडके आदी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व इच्छुक उमेदवारांची यादी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश नेत्यांकडे पाठवण्यात आली असून यावर मुबंईत लवकरच निर्णय होणार आहे. तसेच नवीन तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची निवड २५ एप्रिलपूर्वी घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रत्नागिरीत भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी भाजपाच्या मंत्र्यांनी जास्ती जास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितल्या नंतर हे संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत. तसेच भाजपाने गाव पातळीवर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व वाढल्यास शिवसेनेला हे आव्हानात्क ठरण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.

रत्नागिरी तालुक्यात भाजपाचे संघटन वाढण्यासाठी गावागावात भाजपचा संपर्क राहण्यासाठी नविन पदाधिकारी निवडीचे नियोजन करण्यात आले असून आता या तालुकाध्यक्ष पदांवर कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पक्ष वाढीसाठी सर्वच पक्ष आपआपल्या परिने प्रयत्न करत असतात. शिवसेना देखील पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे. पक्ष वाढीसाठी आमचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळे शिवसेनेचेच जिल्ह्यात वर्चस्व राहणार..- राहुल पंडीत, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट ), रत्नागिरी.