नागपूर: भाजपचा बालेकिल्ला असलेला पूर्व विदर्भ , शिवसेनेचा जोर असलेला पश्चिम विदर्भ आणि कधीकाळी संपूर्ण प्रदेशावर राज्य करणारी कॉंग्रेस असे राजकीय चित्र असलेल्या विदर्भात पहिल्याच दोन टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्या तरी भाजपच्या चार जागांचा अपवाद सोडला तर एकाही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. निवडणूक रणांगण सज्ज असले तरी त्यात लढणारे कोण हेच अद्याप अस्पष्ट आहे. विदर्भात लोकसभेच्या १० जागा आहेत, २०१९ च्या निवडणुकीत भाजप- सेना युतीने ८ जागा जिंकल्या होत्या. एक जागा कॉंग्रेस व एक जागा राष्ट्रवादी समर्थित अपक्षाने जिंकली होती. युतीने जिंकलेल्या आठ जागांपैकी पाच भाजपने, तीन शिवसेनेने जिंकल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. पण प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले नाही. रोज मुंबईत बैठका होत आहे. पण नावे काही जाहीर होत नाही. भाजपने ज्या जांगांवर वाद नाही,अशा चार जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली त्यात नागपूर – नितीन गडकरी, वर्धा – रामदास तडस, अकोला – अनुप धोत्रे आणि चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. पण सध्या त्यांचे विद्यमान खासदार असलेले गडचिरोली व भंडारा – गोंदिया मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केले नाही. असे कॉंग्रेस किवा ठाकरे गटाला करता आले नाही.कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर काही महिन्यानेच कॉंग्रेसने तेथे उमेदवारांची घोषणा केली असती पक्षाला फायदा झाला असता पण अद्याप निर्णय झालेला नाही.
हेही वाचा… गावपातळीवरील प्रचाराची तऱ्हाच निराळी
महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटप न होण्यामागे घटकपक्षांनी दुसऱ्या पक्षांच्या जागांवर केलेला दावा प्रमुख कारण ठरले आहे. कॉंग्रेस व भाजप एकसंघ तर राष्ट्रवादी व शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकलेल्या बुलढाणा, यवतमाळ – वाशिम आणि रामटेक या तीन जागांवर महायुतीकडून शिंदे गटाने तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने दावा केला आहे. तिच स्थिती राष्ट्रवादीची आहे. २०१९ मध्ये भंडारा – गोंदिया, बुलढाणा आणि अमरावती या तीन जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे महायुती व महाविकास आघाडीकडे वरील जागांची मागणी केली. पण महायुतीमध्ये सेनेच्या जागांवर भाजपने तर महाविकास आघाडीत कॉंग्रेसने दावा केला. या शिवाय कॉंग्रेसच्या हक्काची वर्धेची जागा राष्ट्रवादीला हवी आहे तर भाजपचा विद्यमान खासदार असताना गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीने मागितली आहे. भाजपच्या दाव्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेने तर कॉंग्रेसच्या दाव्यामुळे ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले नाही.
हेही वाचा… निवडणूक आयोगाचा महाराष्ट्राला एक तर हरयाणाला दुसरा न्याय
चित्र अस्पष्ट
भंडारा – गोंदियामधे भाजप उमेदवार बदलण्याची चर्चा आहे व त्याला विरोध होत आहे त्यामुळे उमेदवाराची घोषणा लांबली आहे, मात्र गडचिरोलीबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विजयी झालेल्या नवनीत राणा आता भाजपच्या उंबरठ्यावर आहे. भाजप त्यांना कमळ चिन्हावर अमरावतीतून लढवू इच्छित आहे. पण तेथे शिंदे गटाचेच माजी खासदार आनंदराव अडसूळ निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. अडसूळ अमरावतीतून दोन वेळा निवडून गेले हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे अमरावतीचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही. रामटेक तसेत यवतमाळ वाशीम या दोन्ही जागेवर शिंदे यांनी उमेदवार दिले नाही. भाजपचा या दोन्ही जागांवर दावा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडे सक्षम उमेदवार नसणे हे देखील नाव जाहीर होण्यास विलंब होण्याचे कारण आहे. नागपूरमध्ये कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे पण नावाची घोषणा झाली नाही. असेच चित्र सर्वत्र आहे. महायुती आणि मविआ यांच्या बैठका सुरू आहे. पुढच्या काळात काही पक्षांतरे अपेक्षित आहे ते झाल्यावरच पोळा फुटेल असे सध्याचे चित्र आहे.