नांदेड : राज्याच्या राजकारणात तसेच राज्यातील महाविकास आघाडीत वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल दोन आठवडे नांदेडमध्ये मुक्काम ठोकला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील नांदेड, भोकर, नायगाव, हिमायतनगर आणि कुंटूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील लोकनियुक्त संचालक मंडळांची मुदत संपल्यामुळे तेथे काही महिने प्रशासकराज राहिले. त्यानंतर अलिकडेच या संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली.

हेही वाचा… ठाकरे गटाचे १०० जागांवर विशेष लक्ष

नांदेड, भोकर, नायगाव व हिमायतनगर या बाजार समित्यांमध्ये पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. आता होत असलेल्या निवडणुकांमध्ये नांदेड व भोकर येथे काँग्रेससमोर भाजप व अन्य विरोधकांनी आव्हान निर्माण केल्याचे चित्र समोर आल्यानंतर १६ एप्रिल रोजी नांदेडमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांनी येथेच तळ ठोकला. याच तारखेला नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली होती. पण त्या सभेला न जाता येथे दाखल झालेल्या चव्हाण यांनी प्रामुख्याने भोकर बाजार समितीच्या निवडणुकीतच आपले लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा… मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्येच गोंधळ

नांदेडची जबाबदारी त्यांनी डी. पी. सावंत व ओमप्रकाश पोकर्णा यांच्याकडे सोपविली तर नायगावमध्ये माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आघाडी सांभाळली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताना नायगावची निवडणूक बिनविरोध झाली. कुंटूरमध्येही भाजप व काँग्रेस यांच्यात मुदत संपल्यानंतर समझोता झाला, तरी सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तेथे शुक्रवारी मतदान होणार आहे. भोकर बाजार समितीसाठी काँग्रेसच्या विरोधात भाजप आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी सर्व १८ जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे तेथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या पॅनलची जबाबदारी स्थानिक आमदार माधवराव जवळगावकर सांभाळत आहेत.

हेही वाचा… ठाकरे – शिंदे वादाचा वैद्यकीय महाविद्यालयाला फटका? महाराष्ट्र दिनापासून परभणीकर पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

नांदेड बाजार समितीमध्ये काँग्रेसच्या विरोधात खासदार प्रताप पाटील चिखलीकर व शिवसेनेच्या शिंदे गटाने १८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भोकर व नांदेड बाजार समितीची सत्ता हस्तगत करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून ‘धनवर्षाव’ सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. सहकार खात्याच्या निवडणूक प्राधिकरणाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारसभा घेण्याची जबाबदारी टाकली आहे. पक्षाच्या ‘स्टार’ प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नांदेडच्या चव्हाणांचे नावही समाविष्ट करण्यात आले; पण दोन आठवडे नांदेडच्या स्थानिक निवडणुकीत लक्ष घातल्यावर चव्हाण मे च्या पहिल्या आठवड्यात कर्नाटक राज्यात प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For market committee election ashok chavan stayed in nanded for two weeks print politics news asj
Show comments