स्विमिंग पुलमध्ये निवांतपणे मारलेली उडी, एखादा खेळ किंवा स्नॅक्सच्या दोन फेऱ्या आणि पूलच्या बाजूला एक मस्त संध्याकाळ. देशात सध्या रिसॉर्ट राजकारण सुरू आहे आणि यामध्ये कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही. १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा या तीन राज्यांतील आमदार पंचतारांकित हॉटेल्स किंवा रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. ही सगळी व्यवस्था आमदार फुटू नयेत यासाठी करण्यात आली आहे.
उदयपुरच्या ताज अरावली रिसॉर्ट आणि स्पामध्ये २ जूनपासून काँग्रेस आणि त्यांच्या समर्थक आमदारांना वाढदिवसाचे सेलिब्रेशन, चित्रपट, जादूचे प्रयोग, अंताक्षरी या आणि अश्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त ठेवण्यात आले आहे. रिसॉर्टमधील बाहेर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक नेते धमाल करताना दिसत आहेत. यामध्ये राज्यसभेचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा हे जादूच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. काही आमदार सांस्कृतीक कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत तर काही आमदार गाणे गात आहेत. काही आमदार स्विमिंग पूलमध्ये मनमुरादपणे डुबकी मारत आहेत. काही महिला आमदार पाण्यात पाय ओले करत आहेत. आमदारांचे हे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
याउलट भाजपाचे आमदार जयपूरमधील देवीरत्न हॉटेलमध्ये फारच कमी वेळ थांबत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाच्या ६ ते ९ जून दरम्यान भाजपाच्या आमदारांची १२ सत्र आयोजित केली आहेत. ज्यामध्ये पक्षाची विचारधारा, मोदी सरकारची आठ वर्षे, मिशन २०२३ इत्यादी विषयांवर आमदारांशी चर्चा केली जाईल.
रिसॉर्ट राजकारणावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की ” कॉंग्रेसचे आमदार काय करत आहेत हे संपूर्ण राजस्थान पाहत आहे. त्यांच्याकडे पाणी प्रश्नावर उत्तर नाहीये पण त्यांचे आमदार मस्त स्विमिंग पूलमध्ये पोहत आहेत. संपूर्ण सरकार बंदिस्त आहे.
रायपूरमधील मेफेअर लेक रिसॉर्टमधले चित्र काही वेगळे नाही. याठिकाणी हरियाणा काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. २ जून रोजी हरियाणामधील आमदार दिल्लीहुन रायपूरला खास चार्टर्ड विमानाने गेले. १० जूनला मतदान झाल्यानंतरच आमदारांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल.
महाराष्ट्रात माहविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रंगतदार लढत होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा या सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटल किंवा रिसॉर्टमध्ये पाठवले आहे.