सुहास सरदेशमुख
औरंगाबाद: महापालिका निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम )वतीने मुस्लिम समाजाला पाच आरक्षण टक्के आरक्षण मिळावे यासाठी २१ डिसेंबर रोजी नागपूर येथे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. खासदार इत्मियाज जलील या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वी मुस्लिम आरक्षणाचा विषय चर्चेत यावा असा एमआयएमकडून प्रयत्न केले जात आहेत. वर्षभरापूर्वी आरक्षणाची पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून तेलंगणामधील काही प्राध्यापक व अभ्यासकांसह त्यांनी एक कार्यशाळाही औरंगाबाद येथे घेतली होती. त्यास ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनीही हजेरी लावली होती.
हेही वाचा… कृषीपंपाच्या वीज पुरवठ्यात विदर्भात भेदभाव, पालकमंत्र्यांवर आक्षेप
औरंगाबाद महापालिकेतील संथ गतीचा पाणीपुरवठा, आरोग्याच्या प्रश्नावर खासदार जलील आवाज उठवत होते. ‘ दिशा’ समितीच्या बैठकीतही विविध विकास प्रश्नांवर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पंतप्रधान आवास योजनेत भाजपकडून केला जाणारा विलंब आदी विषय त्यांनी राजकीय पटलावर आणले होते. मात्र, सार्वत्रिक विषयावर औरंगाबादसह अन्य मतदारसंघात पाय रोवता येईल असा विषय ‘एमआयएम’ कडून उचलला जात नव्हता. तेलंगणामधील अभ्यासक आणि प्राध्यापकांच्या मदतीने आरक्षणाचे सूत्र जर आर्थिक असेल तर मुस्लिम त्यात खूप मागास आहेत. शिवाय सामाजिक आरक्षणातही मुस्लिमांचा विचार केला जावा अशी मागणी लाऊन धरण्यात आली होती. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातून सुरुवात झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यात निघणाऱ्या सततच्या मोर्चामध्ये आता मुस्लिम आरक्षणाच्या मागणीची भर पडणार आहे. नागपूर येथील इंदोरा मैदानापासून विधिमंडळापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वक्फच्या स्थावर मालमत्तांवर करण्यात आलेल्या कब्जा सोडविण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत, मौलाना आझाद महामंडळास एक हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, तसेच हातमाग आणि वीणकाम करणाऱ्यांना रोजगार व आर्थिक मदत मिळावी अशा मागण्या मोर्चाव्दारे केल्या जाणार आहेत.
हेही वाचा… महाविकास आघाडीचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन
धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद नसली तरी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून ‘ एमआयएम’ कडून ध्रुवीकरणाचे प्रयत्न केले जात असल्याचे आवर्जून सांगितले जात आहे.