नागपूर : मागील निवडणुकीत मतविभाजनाचा फटका बसलेल्या गिरीश पांडव यांना काँग्रेसने पुन्हा एकदा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवल्याने भाजपचे मोहन मते विरुद्ध पांडव यांच्यात अटीतटीची लढत बघावयास मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण नागपूर या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेने नागपूर जिल्ह्यातील दक्षिण नागपूर आणि रामटेक या दोन जागा लढण्याचा आग्रह धरला होता. तर रामटेक लोकसभेची जागा जिंकल्यामुळे ग्रामीणमधील आणि शहरातील सर्व जागा आपल्याकडे राहाव्यात यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होते. गेल्या आठभरापासून या जागेवरून घमासान सुरू होते. पण रामटेकमधून काँग्रेस माघार घेतली. त्यानंतर लगेच शिवसेनेने रामटेकचा उमेदवार जाहीर केला. तरी देखील दक्षिण नागपूरचा तिढा काही सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचात सापडलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ राखण्यात अखेर काँग्रेसला यश मिळाले. पण, या पक्षासमोर वेगळाच पेच होता. या जागेवर लढण्यासाठी काँग्रेसमध्ये तीन-चार इच्छुक होते. पक्षाने मात्र गेल्यावेळी विजयाने हुलकावणी दिलेल्या गिरीश पांडव यांच्या पारड्यात वजन टाकले. आणि आज दक्षिण नागपूर मतदारसंघाचा तिढा सुटला.
या मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपचे मोहन मते विरुद्ध लढताना गिरीश पांडव यांनी कडवी झुंज दिली होती. त्यात त्यांना अल्प मतांनी पराजयाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात झाले होते. बहुजन समाज पार्टीला ५ हजार ६६८, वंचित बहुजन आघाडीला ५ हजार ५८३ आणि तीन अपक्षांनी चार हजारांहून अधिक मते घेतली होती. काँग्रेसचा केवळ ४ हजार १३ मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसने पुन्हा एकदा गिरीश पांडव यांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी बहुल दक्षिण-नागपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अटीअटीत लढत बघावयास मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाची आज दुसरी यादीत जाहीर झाली. दक्षिण नागपूरची उमेदवारी गिरीश पांडव यांना मिळाल्याचे कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पांडव यांच्या मेडीकल चौकातील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते एकत्र आले आणि आतषबाजी करून जल्लोष केला.