ठाणे : नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालखंडातील चुकांवर बोट ठेवत ‘नेताच जर चुकीचा असेल तर सगळीच यंत्रणा चुकते’ या वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता अशी चर्चा आता येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना नाईक यांनी अनेकदा आक्रमक भूमीका घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील या दोघा वजनदार राजकीय नेत्यांमधील छुपा संघर्ष नेहमीच पहायला मिळाला. शिंदे यांच्या कालखंडात नवी मुंबई पोलीस दल तसेच महापालिकेत नेमण्यात आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली होती. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच या चुकांची उजळणी केल्याने शहरात राजकीय वर्चस्वाचे संकेत देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन नेत्यांमध्ये नेहमीच राजकीय संघर्ष पहायला मिळाला. सुरुवातीच्या काळात शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची सुत्र होती. या काळात नवी मुंबई महापालिका तसेच सिडकोत शिंदे यांनी आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना ठाणे जिल्ह्यात शिंदे म्हणतील ती पुर्व दिशा असाच कारभार होता. याच काळात नवी मुंबई पोलीस दलात बीपीनकुमार सिंह यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. बिपीनकुमार यांच्या आधी शहर पोलीस दलाचे आयुक्त असलेले संजय कुमार हे कडक शिस्तीचे आणि धोरणी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. नवी मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कारकिर्द अनेक महत्वाच्या कामांमुळे चर्चेत राहीली. त्यांच्या काळात शहरातील कायदा-सुव्यस्थेला वळण असल्याचे दिसत होते. नंतरच्या काळात मात्र नवी मुंबई पोलीस दलातील बेदीलीची चर्चाच अधिक सुरु झाली. नवी मुंबईतील भाजप आमदारांनी तर बीपीन कुमार यांच्या काळात पोलीस कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे टिका सुरु केली होती. नवी मुंबईतील एका वाहतूक उपायुक्ताच्या कारभाराबद्दल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेले आरोप त्यावेळी गाजले होते. नवी मुंबई पोलीस दलातील बदल्या, बढत्या, मोक्याच्या जागांवरील नियुक्त्यांसाठी केल्या जाणाऱ्या उद्योगांची चर्चा प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात दबक्या आवाजात सुरु असायची. नवी मुंबई पोलीस ,लोकप्रतिनिधी, नागरिकांमधील संवाद याच काळात जवळपास संपल्यात जमा होता. राज्यात महायुतीचे सरकार येताच काही महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाने नवी मुंबईत मिलींद भारंबे यांना पोलीस आयुक्तपदी पाठविण्यात आले. असे असले तरी या काळातही काही उपायुक्तांच्या नियुक्त्यांवर ठाण्याचा असलेला प्रभाव वादग्रस्त ठरु लागला होता. गणेश नाईकांनी पोलीसांच्या कार्यक्रमातच शिंदे यांच्या कार्यकाळाविषयीच्या घटनांबद्दल केलेल्या वक्तव्याला ही सगळी पार्श्वभूमी असल्याची आता चर्चा आहे.

हेही वाचा >>> ‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

नवी मुंबईचे कारभारी यापुढे कोण ठरविणार ?

‘शिंदे यांच्या कार्यकाळात शहरात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या मी त्यांना सांगितल्या. परंतु काही काळ हतबलतेचा असतो. आता देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे. आता परिस्थिती बदलली आहे’ असे सुचक वक्तव्य करत गणेश नाईक यांनी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी बदलाचे संकेत तर दिले नाहीत ना अशी चर्चा आता रंगली आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे स्वत:कडे ठेवतील अशीच शक्यता अधिक आहे. गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाईल असे बोलले जाते. असे असले तरी नवी मुंबई शहराचे कारभारी यापुढे कोणामार्फत ठरविले जातील याविषयीची उत्सुकता कायम आहे. नाईक मंत्री नसताना नवी मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपद्धती त्यांना मान्य नव्हती असे बोलले जाते. काही उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची मनमानीविरोधात नाईकांनी अनेकदा तक्रारीही केल्या. नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर नाईकांचा रोष जाहीरपणे दिसून आला आहे. येथील नियुक्तांमध्ये ठाण्याचा प्रभाव नाईकांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात नाईकांनी शिंदे यांच्याविषयी वक्तव्य करताना यापुढील काळ फडणवीस यांचा असेल असे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest minister ganesh naik criticized eknath shinde governance during his cm tenure print politics news zws