मालदीवमध्ये सत्ताबदल होताच भारताबरोबरच्या संबंधांमध्येही बदल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन मालदीवच्या जवळ येत आहे, त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. विशेष म्हणजे मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे. मागील काही काळापासून भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेला राजनैतिक तणाव आणखीनच खालच्या पातळीवर पोहोचला होता, जेव्हा चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी १० मार्चपर्यंत सर्व भारतीय लष्करी सैन्याला देशातून बाहेर काढण्याची योजना जाहीर केली.
भारताच्या बहिष्कारामुळे मालदीवमधील विविध क्षेत्रांवर विशेषत: पर्यटनावर परिणाम होत आहे, जो मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “मी भारतीय लोकांना त्यांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनासाठी मालदीवमध्ये येण्याचे आवाहन करू इच्छितो, आमच्या आदरातिथ्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. भारताच्या बहिष्काराचा मालदीववर मोठा परिणाम झाला आहे, असं म्हणत मला याबद्दल खूप काळजी वाटत असून, मालदीवच्या लोकांनाही याबद्दल खेद वाटतोय, जे घडले याबद्दल आम्हाला खेद वाटत असल्याची भावनाही मोहम्मद नशीद यांनी बोलून दाखवली.
भारताच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचंही कौतुक
नशीद यांनी अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचंही कौतुक केलं. भारताने दबाव आणण्याऐवजी राजनैतिक चर्चेचा प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी अधोरेखित केले. “जेव्हा मालदीवच्या राष्ट्रपतींना भारतीय लष्करी जवानांनी तेथून निघून जावे असे वाटत होते, तेव्हा भारताने काय केले हे तुम्हाला माहिती आहे? त्यांनी आगपाखड केली नाही. त्यांनी कोणतीही ताकद दाखवली नाही, परंतु मालदीव सरकारला चर्चा करण्याचा सल्ला दिला,” असंही नशीद यांनी सांगितलं.
खरं तर सरकार हे बंदुकीच्या जोरावर चालत नसते
मालदीव आणि चीन यांच्यात नुकताच संरक्षण करार झाला आहे. परंतु नशीद यांनी हा संरक्षण करार नसून उपकरणांची खरेदी असल्याचे सांगत तो फेटाळला. “मला वाटते की मोहम्मद मुइज्जूला काही उपकरणे खरेदी करायची होती, प्रामुख्याने त्यात रबर बुलेट आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा समावेश होता. परंतु हे अत्यंत दुर्दैवी आहे की, सरकारला अधिक अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अधिक रबर गोळ्यांची गरज लागतेय. खरं तर सरकार हे बंदुकीच्या जोरावर चालत नसते हे त्यांना समजलं पाहिजे”, असंही नशीद म्हणालेत.
हेही वाचाः राहुल गांधींसाठी अमेठी? वायनाड? की दोन्ही? काँग्रेसने घेतला ‘हा’ निर्णय…
राष्ट्रांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि राजनैतिक मार्गाने वाद सोडवले पाहिजेत, अशीही इच्छा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच व्यक्त केली होती. “मानवता हीच खरी माणुसकी आहे. मुत्सद्दीपणा हा मुत्सद्दीपणा आहे आणि राजकारण हे राजकारणच आहे. संपूर्ण जग नेहमीच जबाबदारीने चालत नसते. त्यामुळे जर आपण अशा परिस्थितीचा सामना करत असू तर त्यावर तोडगा हा मुत्सद्देगिरीतूनच निघू शकतो,” अशी भूमिकाही जयशंकर यांनी मांडली आहे.
भारताबरोबर मिळून मालदीव हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणार होता, परंतु आता मालदीवने या कराराची मुदतवाढ देणार नसल्याचे जाहीर केले होते. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी प्रस्थापित परंपरा मोडीत काढत त्यांचा भारत भेटीचा पहिला अधिकृत दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याऐवजी ते आधी तुर्की आणि नंतर चीनला भेट देणार आहेत.