छत्रपती संभाजीनगर – पंतसंस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारे माजी आमदार सुभाष झांबड सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर कॉग्रेसमध्ये राहिले. त्यांनी एका माजी मंत्र्यांच्या मदतीने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांची ठरलेली उमदेवारी रद्द करायला लावली होती. सहा वर्षे आमदार असणाऱ्या झांबड यांनी पक्ष वाढीसाठी मात्र फारसे प्रयत्न केले नाहीत. उलट पतसंस्थेतील घोटाळयात अटक होऊ नये म्हणून त्यांनी बऱ्याच कसरती केल्या.
सुभाष झांबड वैजापूर तालुक्यातील. करजगाव हे त्यांचे मूळगाव. त्याचे ज्येष्ठ बंधू काँग्रेसकडून वैजापूर विधानसभा निवडणूक लढलेले. सुरुवातीला सुभाष झांबड हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. परंतु नंतर काँग्रेसमध्ये आले आणि जालना-आैरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळवत निवडूनही आले. आैरंगाबाद हौसिंग फायनान्सचा अध्यक्षही होते. बड्या वाहनांच्या एजन्सी, शहरातील जालनारोडवरील प्रमुख ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता, अजिंठा बँक, बांधकाम क्षेत्रातही शिरकाव, असा सारा डामडौल उभा केलेला होता.
झांबडच्या छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पहिला अपहार ९७ कोटी ४१ लाखांचा समोर आला. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश पंडितराव काकडे यांच्या फिर्यादीवरून १८ ऑक्टोबर २०२३ रोजी चेअरमन सुभाष मानकचंद झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी, सनदी लेखापाल सतीश मोहरे, चेतन गादिया, भूषण शहा, दीपाली कुलकर्णी यांच्यासह १ मार्च २००६ ते ३० ऑगस्ट २०२३ च्या संचालक मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमान्वये संगणमताने बँकेची व ठेवीदारांची ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ काेटींच्या अपहाराचा दुसरा गुन्हा नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल झालेला आहे.
कसा केला अपहार ?
बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगणमताने ३६ खोटे व बनावट अनामत ठेवी (एफ.डी.) वर कर्जदारांना कर्ज विनातारण दिले. खोटी व बनावट नोंदी घेऊन खोटाच हिशोब तयार केला. बँकेच्या वैधानिक लेखा परिक्षण अहवाल २०२२-२३ नुसार ४० हजार १२९.६१ लाख रुपयांच्या ठेवी असल्याचे दिसून येते, असा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेने खंडपीठात सादर केलेला आहे.
पोलिसांना १५ महिने गुंगारा
झांबडविरुद्ध ९७ काेटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरपासून तब्बल १५ महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी पोलीस आयुक्तांना झांबड न सापडण्यामागचे कारण विचारले असता त्याला फरार घोषित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही झांबडना अभयच मिळत गेले. झांबड शहरात असतानाही त्यांना कशी अटक होत नाही, असा प्रश्न ठेवीदारांकडून उपस्थित केला जात होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वेळा, आैरंगाबाद खंडपीठानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.