पश्चिम दिल्लीतील काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत मिश्रा ‘आप’मध्ये दाखल झाले आहेत. ४ डिसेंबरला होणाऱ्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मिश्रा यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे.
MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान
मिश्रा हे पुर्वांचली समाजाचे दिल्लीतील प्रमुख नेते आहेत. १९९७ साली दिल्ली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. २०२० मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांखाली त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यांचे पुत्र विनय मिश्रा यांनी द्वारका मतदारसंघातून ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवण्यानंतर काँग्रेसने महाबल मिश्रांवर निलंबनाची कारवाई केली होती.
६९ वर्षीय महाबल मिश्रा हे मूळचे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, सध्या दिल्लीच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक पुर्वांचली आहेत. मिश्रा यांच्या पक्षप्रवेशानंतर पुर्वांचली जनतेचे समर्थन ‘आप’ला मिळण्याची शक्यता आहे.
महाबल मिश्रा यांनी पश्चिम दिल्लीतून २००९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राजधानी दिल्लीतील सर्व सात जागा भाजपाने जिंकल्या होत्या.