जळगाव – विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपने आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात शिवसेनेने (उद्धव ठाकरे) माजी महापौर जयश्री महाजन यांना रिंगणात उतरविले आहे. उमेदवारी न मिळाल्याने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापौरांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवली आहे.

जळगाव शहर मतदारसंघ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. महाविकास आघाडीत या मतदारसंघावरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी निवडणूक लढविण्यासाठी काही दिवसांपासून तयारी सुरु केली होती. जळगाव शहराची जागा शरद पवार गटाकडे जावो किंवा ठाकरे गटाकडे, दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढण्याची मानसिकता त्यांनी केली होती. माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही ठाकरे गटाकडून जळगाव शहराची उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिष्ठा पणाला लावली होती. जागांच्या वाटाघाटीत शरद पवार गटाने जळगाव शहर मतदारसंघ ठाकरे गटाला सोडल्याने जयश्री महाजन यांना पक्षाने उमेदवारी दिली.

हेही वाचा >>>“पार्सल उमेदवार नको,” भाजपच्या दोन माजी आमदारांचा देवराव भोंगळे यांना विरोध

उमेदवारी न मिळाल्याने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आता बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी महाजन यांच्याआधीच अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना पाटील यांच्याबरोबर ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक अमर जैन यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली नसली तरी जळगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.