१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएतर्फे द्रोपदी मुर्मु यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु यांच्या नावाची चर्चा झाली होती. त्यावेळी झारखंडच्या राज्यपाल असणाऱ्या आणि आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या द्रौपदी मुर्मु या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती पदासाठी पहिली पसंती होती. मात्र त्यावेळी रामनाथ कोविंद यांची निवड करण्यात आली होती.
मूळच्या ओडीसामधील मयुरभंज भागातील असणाऱ्या मुर्मु यांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर २००० ते २००९ या या काळात त्या दोन वेळा मयुरभंजमधील रायरंगपूर मतदार संघातून २ वेळा भाजपाच्या तिकीटवरून निवडून आल्या होत्या. त्यांनी वाणिज्य, वाहतूक आणि त्यानंतर मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री म्हणून कारभार संभाळला आहे. आमदार होण्याआधी म्हणजेच १९९७ साली मुर्मु या रायरंगपूर नगर पंचायतीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर त्यांच्यावर भाजपा आदिवासी विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१५ साली द्रौपदी मुर्मु यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
द्रौपदी मुर्मु यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पती श्यामचरण मुर्मु आणि दोन मुलांच्या निधनाचा धक्का पचवून त्या राजकारणात खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. एनडीएकडे एकूण मतांपैकी ४८ टक्के मते असल्यामुळे राष्ट्रीपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मुर्मु यांच्या विजयामुळे भाजपाला आदिवासी समाजात आपली वोट बॅंक मजबुत करण्यास मदत होणार आहे. ओडीसामध्ये बिजू जनता दल आपली ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुर्मु यांचा विजय झाल्यास भाजपाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.