विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार, विद्यमान आमदाराची अडचण

अर्जूनी मोरगाव या मतदारसंघातून राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात अजित पवार गटाचेच मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत.

arjuni morgaon assembly, rajkumar badole, NCP Ajit Pawar
विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार ( image courtesy – Ajit Pawar FB page )

नागपूर : २०१४ मध्ये फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असलेले गोंदिया जिल्ह्यातील भाजप नेते राजकुमार बडोले यांनी मंगळवारी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला. त्यांना अर्जूनी मोरगाव या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात अजित पवार गटाचेच मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत. बडोलेंच्या प्रवेशाने त्यांची अडचण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर विदर्भातील ज्या पाच आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात गोंदिया जिल्ह्यातील मनोहर चंद्रिकापुरे यांचा समावेश होता. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार गटाकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र बडोलेंच्या प्रवेशामुळे राजकीय समिकरणच बदलले आहे.

हे ही वाचा… मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

मंगळवारी मुंबईत झालेल्या सोहोळ्यात अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितत बडोले यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. बडोले यांच्या प्रवेशाने पूर्व विदर्भात पक्ष बळकट होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

बडोले अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा निवडून आले २०१९ मध्ये त्यांचा एकसंघ राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी अवघ्या ७१५ मतांनी पराभव केला होता. या त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघासाठी तेच प्रबळ दावेदार होते. मात्र अजित पवार यांचा गट महायुतीत सहभागी झाल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटणार हे निश्चित झाले. त्यामुळे बडोले यांच्यापुढे निवडणूक न लढणे किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करणे हे दोनच पर्याय शिल्लक होते. त्यापैकी त्यांनी दुसरा पर्याय निवडला, असे सांगितले जाते. मात्र बडोले यांना प्रवेश देताना राष्ट्रवादीने स्वपक्षाच्या विद्यमान आमदाराचा विचार न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी यावेळी मुलासाठी उमेदवारी मागितली होती, अशी माहिती आहे.

हे ही वाचा… उल्हासनगर भाजप आमदारावरील टांगती तलवार कायम

तिसरा प्रयोग

एका पक्षाचा उमेदवाराने आघाडी-युतीतील दुसऱ्या घटक पक्षाकडून निवडणूक लढवणे हा लोकसभा निवडणुकीनंतरचा विदर्भातील तिसरा प्रयोग आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राजू पारवे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता व रामटेक लोकसभा निवडणूक लढवली होती. तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) प्रवेश करत या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली व ते खासदार झाले. आता विधानसभा निवडणुकीत बडोले यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. परस्पर विरोधी विचाराचे पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीत सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी जागा -वाटपाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर पक्षांतर हा नवा तोडगा नेत्यांनी शोधून काढला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former minister of bjp in vidarbha rajkumar badole will contest from ajit pawar ncp group print politics news asj

First published on: 22-10-2024 at 16:39 IST
Show comments