महाआघाडीच्या स्थापनेमुळे पक्षात झालेली कोंडी आणि शिंदे गटाच्या उठावानंतर जिल्ह्यात शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची झालेली वाताहत, यामुळे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शिवबंधन तोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. त्यामुळे दक्षिण रायगडात पक्षाची मोट बांधून ठेवेल असे एकही नेतृत्व त्यांच्याकडे उरलेले नाही.
हेही वाचा- मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल
श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर मात्र तटकरे कुटुंबातील गृहकलह उफाळून आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ साली पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी सोपविली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे अवधूत यांची पक्षात चांगलीच कोंडी झाली होती. ज्या गृहकलहामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसशी महाविकास आघाडीमुळे जुळवून घेण्याचे धोरण पक्षाने अवलंबले होते. त्यामुळे अवधूत यांचा शिवसेनेत कोंडमारा होत होता.
हेही वाचा- अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ; काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंब्याच्या बदल्यात पाठिंबा
त्यामुळे गेली चार वर्षे शिवसेनेत असूनही अवधूत तटकरे विजनवासात होते. सक्रीय राजकारणापासून त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात शिंदे गटाच्या उठावानंतर रायगड जिल्ह्यातील तिन्ही शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला उतरती कळा लागली होती. त्यामुळे पक्षात राहून काहीच हाती लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिंदे गटात सहभागी होणे अथवा भाजपात जाणे असे दोन पर्याय अवधूत यांच्यासमोर होते. त्यापैकी भाजपाचा पर्याय अवधूत यांनी निवडला.
हेही वाचा- विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?
दक्षिण रायगडात भाजपाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती. पक्षसंघटना वाढीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्नही सुरू होते. पण नेतृत्व नसल्याने अपेक्षित यश मिळत नव्हते. अवधूत तटकरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ती पोकळी भरून निघेल असा विश्वास वाटतो आहे. पण गेली चार वर्षे विजनवासात असलेल्या अवधूत यांना त्यांचे अनेक सहकारी सोडून गेले आहेत. अशावेळी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांची नव्याने मोट बांधणे आणि भाजपाच्या संघटनात्मक प्रक्रियेशी जुळवून घेणे या दोन पातळ्यांवर अवधूत यांना आगामी काळात काम करावे लागणार आहे.
हेही वाचा- ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार
पक्षप्रवेशाचा निर्णय घेतांना माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आगामी काळत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे अवधूत तटकरे म्हणाले.