सांगली : जतमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्‍याची तीव्र टंचाई ऐन पावसाळ्यात भासत असताना राजकीय कुरघोडीचे राजकारण मात्र जोमात सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपअंतर्गत वाद विकोपाला पोहोचला आहे. प्रचार प्रमुख तमणगोंडा रवि पाटील यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या नियुक्तीलाच माजी आमदार विलासराव जगताप यांनी आव्हान देत वेगळा विचार करण्याचे मनसुबे जाहीर कार्यक्रमातून व्यक्त केले आहेत. पक्षाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न चालविला असला तरी युवाशक्ती नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या जिल्ह्याचा पश्‍चिम भाग वगळता पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंतच्या काळात केवळ ५० ते ६० टक्केच पाऊस झाला आहे. एकीकडे दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असताना भाजपमध्ये मात्र राजकीय कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे.

हेही वाचा : यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या महिला नेत्यांकडे काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी

दोन महिन्यापुर्वी भाजपने लोकसभा व विधानसभा क्षेत्र निहाय प्रचार प्रमुख निश्‍चित केले. सांगली लोकसभेसाठी दीपक शिंदे तर हातकणंगलेसाठी सत्यजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघासाठी प्रचार प्रमुख नियुक्त करून त्यांच्याद्बारे लोकसभेची तयारी सुरू केली. या प्रचार प्रमुखांच्या माध्यमातून वॉररूम सुरू करणे, मोदी अ‍ॅट नाईनच्या माध्यमातून सरकारची कामगिरी लोकापर्यंत पोहचवणे, लाभार्थींचे मेळावे निश्‍चित करणे, गावपातळीवर प्रभाग निहाय मतदान केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख नियुक्त करून त्यांची यादी तयार करणे आदी कामे या प्रचार प्रमुखांच्या माध्यमातून केली जात आहेत. यामागे लोकसभेची तयारी तर आहेच, पण विधानसभेसाठी नांगरणीही आहे.

हेही वाचा… काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांचे महत्त्व वाढले, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडेही जबाबदारी

जिल्ह्यात आठही विधानसभा मतदार संघासाठी प्रचार प्रमुख नियुक्त करण्यात आले असले तरी जत वगळता अन्य मतदार संघातील प्रचार प्रमुखांबाबत कोणाचीच तक्रार नाही. मात्र, जतमध्ये तमणगौडा रवि पाटील यांच्या नियुक्तीला माजी आमदार विलासराव जगताप यांनी आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप घेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविपाटील यांना केंद्रीय रस्ते विकास महामंडळावर काम करण्याची संधी दिली. यामुळे जगताप यांच्या मागणीला पक्षातून बाय दिला जात असल्याने या गटाची तिळपापड होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. मला न विचारता पक्षाच्या वरिष्ठांनी कशी नियुक्ती केली अशी विचारणा त्यांनी केली आहे. या विरूध्द पक्ष नेतृत्वाविरूध्द आगपाखड करीत असताना मी म्हणजेच पक्ष आणि मी म्हणेल त्यालाच पद अशी भूमिका घेतली आहे. रविपाटील यांना पदावरून दूर करावे आणि मी सांगेन त्यालाच पद द्यावे या मागणीसाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली. मात्र, शिष्टमंडळाला घेउन दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांना सोबत घेतले होते. मुळात जगताप यांना पक्षाकडून अलिकडच्या काळात महत्व दिले जात असल्याची खदखद आहे. यातूनच पक्षांतर्गत दबाव गट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत असताना वेगळी भूमिका घेण्याचा दिलेला इशारा म्हणजे मी सांगेल तीच पूर्व दिशा अशीच गत आहे. तसेच पक्षाचे खासदार संजयकाका पाटील यांच्याबाबतही जगताप यांची भूमिका वादग्रस्तच नव्हे तर टोकाचा विरोध करणारी आहे.

हेही वाचा : तृणमूल काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याच्या जावायाचा काँग्रेसमध्ये प्रेवश; विरोधकांच्या आघाडीचे काय?

या राजकीय सुंदोपसुदीमध्ये जतचा पाण्याचा प्रश्‍न मात्र अधिकच तीव्र बनत चालला आहे. तालुक्यातील २२ गावांना सध्या टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या ४२ गावांसाठी सुधारित म्हैसाळ सिंचन योजना मंजूर झाली आहे. यासाठी निविदाही निघाली, मात्र, प्रत्यक्षात काम सुरू करण्याला मुहुर्त मिळेना झाला आहे. या उद्वेगातून पाणी संघर्ष समितीने सुरू केलेला लढा पुन्हा तीव्र बनत चालला असून कर्नाटकमध्ये सहभागी होण्याची मागणी अधिक तीव्रतेने पुढे येऊ लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla challenged bjp leadership in jat of sangli district print politics news css