दापोली : दापोली मतदार संघातील माजी आमदार तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री रामदास कदम आणि संजय कदम यांची चर्चा झाल्याने कोकणातील राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होणार आहे. माजी आमदार संजय कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती लवकरच पक्षप्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दापोली मतदार संघातील संजय कदम व रामदास कदम यांच्यामध्ये मोठा संघर्ष असताना या दोघांकडून एकमेकांवर अतिशय टोकाची टीका केल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले आहे. शिवसेना पक्ष सोडल्यानंतर संजय कदम यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी दापोली मतदार संघातून शिवसेनेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. कालांतराने रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे या मतदार संघात सक्रीय झाले व त्यांनी पहिल्याच निवडणुकीत संजय कदम यांना पराभूत करत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा दापोली मतदार संघावर फडकावला.

शिवसेनेत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असे दोन गट झाल्यानंतर योगेश कदम हे शिंदेंच्या सोबत राहिले. तर राष्ट्रवादी सोडून संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा शिव बंधन बांधून घेतले.

राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा संघर्ष झाला. यात संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. कोकणात ठाकरेंचे निष्ठावंत अशी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःची ओळख निर्माण करून घेतली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावर संजय कदम यांनी निवडणूक लढवली. परंतु, दापोली मतदार संघातील आमदार योगेश कदम यांनी त्यांचा पुन्हा एकदा दारुण पराभव केला. दापोली मतदार संघातील उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या वर्षभरात शिंदेच्या गटात गेले आहेत. नुकताच दापोली नगर पंचायती मधील नगरसेवकांच्या एका मोठ्या गटाने रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मात्र याने संजय कदम यांच्या राजकीय अस्थित्वाला धोका निर्माण झाल्याने ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय कदम यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, या वृत्ताला अद्याप संजय कदम यांनी दुजोरा दिलेला नाही. तर स्थानिक शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी देखील सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या वृत्तामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.