जळगाव : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विशेषतः शिवसेनेत (एकनाथ शिंदे) दुसऱ्या पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता दोन माजी आमदारांची भर पडण्याची शक्यता आहे. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी आणि पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंड पुकारले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेच्या निवडणुकीत अमळनेरची जागा राष्ट्रवादीकडे (अजित पवार) असताना, त्या पक्षाचे उमेदवार अनिल पाटील यांच्या विरोधात भाजप समर्थक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिले होते. चौधरी यांनी पाटील यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची सुमारे ७६ हजार मते मिळवून आपला प्रभाव देखील सिद्ध केला होता. निवडणुकीनंतर भाजपपासून लांब गेलेले माजी आमदार चौधरी यांनी रविवारी जळगावच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, पाचोरा मतदारसंघातील शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्या राष्ट्रवादीत (अजित पवार) स्थिरावलेले माजी आमदार दिलीप वाघ यांनीही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावमध्ये भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. ते लवकरच मुंबईत समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. माजी आमदार वाघ यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत पाचोऱ्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतरही त्यांचे भाजपकडून स्वागत होत असल्याने शिंदे गटात नाराजी व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीत अमळनेरची जागा राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वाट्याला गेल्याने, मला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता. माझे भाजप नेत्यांशी असलेले संबंध आजही कायम आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.- शिरीष चौधरी (माजी आमदार, अमळनेर)

राष्ट्रवादीत (अजित पवार) काम करत असताना, विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास न दाखवल्याने अपक्ष लढलो. मात्र, आता मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.- दिलीप वाघ (माजी आमदार, पाचोरा)