रत्नागिरी : कोकणच्या राजकारणात सुमारे चार दशकांहून जास्त काळ पकड असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव व माजी खासदार नीलेश राणे यांनी स्थानिक राजकारणात कोंडी झाल्याने राजकीय संन्यासाची घोषणा केली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐन विजयादशमीच्या मुहूर्तावर नीलेश यांनी राजकारणात मन रमत नसल्याने आपण सक्रीय राजकारणातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोकणच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण आगामी लोकसभा -विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता नीलेश यांची भावी वाटचाल खूपच खडतर दिसत होती. लोकसभा निवडणुकीत लागोपाठ दोनवेळा पराभव झाल्यामुळे त्या निवडणुकीत पुन्हा न उतरण्याचा निर्णय त्यांनी यापूर्वीच घेतला आहे. नारायण राणे यांचा पारंपरिक कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघातून त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्न चालू होते. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी तर काही महिन्यांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात तशी घोषणाही करुन टाकली. पण त्याबाबत सध्या तरी काही खात्री देता येणार नाही. कारण, इडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी या मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर विद्यमान आमदार म्हणून येथे त्यांनाच उमेदवारी मिळणार , हे उघड आहे. तसे नाही झाले तरी दोन सख्ख्या भावांना भाजपा पक्षश्रेष्ठी एकाच जिल्ह्यातून उमेदवारी देतील का, अशीसुद्धा शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने खुद्द नारायण राणे यांनासुद्धा पराभवाची चव चाखावी लागली होती आणि तो सल त्यांच्यासह राणे कुटुंबाच्या मनात आजही कायम आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. राणे यांचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश यांच्या कणकवली मतदारसंघात बावनकुळे यांनी ‘घर चलो अभियाना’त भाग घेतला . तसेच सावंतवाडीत पक्षाच्या ‘वॉर रुम’चे उद्घाटन केले. या दौऱ्यात नीलेश सहभागी होते. पण कुठेही तशी खास जबाबदारी नव्हती.

हेही वाचा >>>मध्य प्रदेशमध्ये नेत्यांच्या राजीनामा अस्त्रामुळे भाजपा आणि काँग्रेस हैराण; तिकीट नाकारल्यामुळे नाराजी

या पार्श्वभूमीवर लक्षात घेण्याजोगा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, दस्तुरखुद्द नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. त्यानंतर त्यांना भाजपा काय जबाबदारी देणार, हे सध्या अनिश्चित आहे. त्याचप्रमाणे, राणे बंधुंचे राजकीय भवितव्य, आगामी लोकसभा निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राणे पिता-पुत्रांच्या योगदानाच्या परिणामकारकतेवर अवलंबून राहणार आहे. ही परिस्थिती भावी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने खूपच अनिश्चित, अस्थिर असल्याचे लक्षात आल्यामुळे नंतर मानहानी होण्यापेक्षा आपणच त्यापासून दूर झालेले बरे, असा विचार नीलेश यांच्या या घोषणेमागे दिसत असल्याची अटकळ बांधली जात आहे. अर्थात अशा स्वरुपाच्या राजसंन्यासाच्या घोषणा परिस्थिती बदलली तर विरुनही जाऊ शकतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण तूर्त तरी नीलेश राणे यांनी संभाव्य कोंडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हा पर्याय निवडला असावा, असे मानले जात आहे.गुप्तेही खुपले?

एका खासगी वाहिनीवर प्रसिद्ध गायक-निवेदक अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय मालिकेत अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रित करुन व्यक्तिगत विषयांवरही बोलते केले जाते. या कार्यक्रमात ‘रॅपिड फायर’ या भागात विचारलेल्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देणे अपेक्षित असते. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे सहभागी झाले होते . ‘रॅपिड फायर’मध्ये त्यांना, राजकारणात नीलेश आणि नीतेश या दोघांपैकी जास्त आश्वासक कोण वाटतं ,असा थेट प्रश्न गुप्ते यांनी विचारला. त्यावर राणेंनी क्षणाचाही विलंब न करता, धाकटे चिरंजीव आमदार नीतेश यांचे नाव घेतले. नीलेश यांना हेही खुपले असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp nilesh rane announced his retirement from politics due to a dilemma in kokan politics print politics news amy
Show comments