जालना : ‘माजी’ म्हटल्याने आपल्याला काही फरक पडत नाही, सिर्फ ‘रावसाहेब दानवे’ नाम ही काफी है, असे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथे सांगितले. पराभूत झाल्यानंतरही जिल्ह्याच्या बाहेर लोक आपल्याला कसे ओळखतात, याची दोन उदाहरणे त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी खासदार दिवंगत पुंडलिक हरि दानवे यांचे नाव भोकरदन येथील शासकीय औद्योगिक संस्थेस देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मूळ भाजपचे असलेले आणि जवळपास मागील तीन दशकांपासून रावसाहेब दानवे यांच्याशी राजकीय मतभेद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेबांचा उल्लेख करून आपण दोघेही आता माजी आहोत, असा चिमटा काढला होता. त्याचा संदर्भ देऊन रावसाहेब दानवे म्हणाले, ‘१९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. त्यापूर्वीपासून आपण पक्षात आहोत. भाजपच्या संस्थांपैकी आपण एक आहोत. अलीकडे दुबईला गेलो होतो, तर रत्नागिरी, चिपळूण भागातील लोक माझ्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी आले. थायलंडला सहकुटुंब गेलो होतो तेव्हा एका वृद्धाने विचारले, तुम्ही पुढारी आहात का? त्यावर त्याची बायको म्हणाली, हे आपल्याकडे भाजपचे अध्यक्ष होते, त्या रावसाहेब दानवे यांच्यासारखे दिसतात. त्यानंतर संतोष दानवे यांना मी कोण आहे, ते सांगितले. त्यावर त्या वयोवृद्ध गृहस्थांनी मला लहानपणी पाहिल्याची आठवण काढली. आपण माजी असलो, तरी दोन आमदार (आमदार संतोष दानवे आणि आमदार संजना जाधव) जन्माला घातले असल्याचे सांगून त्यांनी या निमित्ताने चंद्रकांत दानवे यांना चिमटा काढला. पुंडलिकरावांच्या जुन्या आठवणी सांगून विकासाच्या मुद्द्यांवर चंद्रकांत दानवे यांच्याशी त्यांच्या घरी किंवा कोठेही चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचेही ते म्हणाले.

रावसाहेब दानवे आणि आपण दोघेही आता माजी आहोत. हा कार्यक्रम शासकीय असला, तरी तो यापेक्षा मोठा करता आला असता. दिवंगत पुंडलिकराव दानवे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, जनता पार्टी, भाजपमध्ये होते. आपण तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून गेलेलो असल्याने शिस्तीचे पालन करणारे आहोत. या कार्यक्रमाच्या संदर्भात अगोदर सांगितले असते, तर कार्यक्रम अधिक चांगला केला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्यविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अजित पवार, एकनाथ शिंदे, आमदार संतोष दानवे यांच्या सहकार्याने हे नामकरण झाले. मुंबईस गेल्यावर या सर्वांना भेटून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानणार आहे. दिवंगत पुंडलिकरावांनी बाळासाहेब पवार आणि माणिकराव पालोदकर या दिवंगत नेत्यांविरुद्ध लोकसभेची निवडणूक जिंकली होती. हैदराबाद मुक्तिलढ्यात त्यांचे योगदान होते. – चंद्रकांत दानवे, माजी आमदार

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp raosaheb danve talk in program bhokardan jalna print politics news ssb