सांगली : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मैदानात उतरलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या घरवापसीचे संकेत मिळत असून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी न लावणार्या काकांनी कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीस आवर्जुन हजेरी लावली. आणि भाजपनेही त्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले. दुसर्या बाजूला खासदारकी नंतर झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पाटलांना आता विधान परिषदेच्या सदस्यत्वाचे वेध लागले असल्याची चर्चा असून यासाठीच त्यांचा भाजप नेत्यांशी जवळीक  साधण्याचा प्रयत्न दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडण्ाुकीत भाजपने संजयकाका पाटील यांना तिसर्यांदा संधी दिली. मात्र, त्यांचा अपक्ष म्हणून मैदानात आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेससह अन्य भाजप विरोधी पक्षाच्या मदतीने लाखाहून अधिक  मताधिक्यानी पराभव केला. यानंतर राजकीय स्थैर्यासाठी त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात मोर्चेबांधणीही केली. मात्र, महायुतीमध्ये जागा वाटपात  ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपसोडून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तासगाव-कवठेमहांकाळची जागा प्रतिष्ठेची करत राजकीय मोर्चेबांधणी करत कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांना सोबतीला दिले. सरकार-काका गट मतदार संघात एकत्र येउनही आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी याठिकाणी मोठ्या फरकाने काकांना पराभूत करत विजय संपादन करीत आमदारकी अंजनीतच राहील याची खबरदारी घेतली. हा दारूण पराभव होउनही गप्प बसतील ते काका कसले? माध्यमापासून दूर राहूनही काकांचे राजकीय डावपेच सुरूच राहिले आहेत.

पालकमंंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सांगली दौरा असेल तर काका हमखास त्यांची भेट घेउन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असले तरी दादांच्याकडून अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणवत आहे. रविवारी कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकार्यांची प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष  रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस केवळ भाजप पदाधिकारीच आमंत्रित असताना माजी खासदार पाटील यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली.

भाजप नेत्यांनीही चार-सहा महिन्यापुर्वीचे दिवस आठवत काकांना पहिल्या रांगेत स्थान दिले. दुसर्या बाजूला त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे अद्याप भाजपचे तासगाव-कवठेमहांकाळचे विधानसभा क्षेत्र प्रमुख आहेत. या नावाखाली भाजप सभासद नोंदणी मध्ये तासगावमध्ये गतीने काम सुरू असून या गटाचे कार्यकर्तेच यामध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते.

याबाबत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारणा झाली असता त्यांना ताकास  तूर लागू न देता त्यांचे आमचे संबंध जुने असून एक मित्र पक्षाचे नेते म्हणून त्यांना बैठकीत उपस्थित राहण्याची संधी  दिल्याचे सांगत वेळ मारून नेली.

नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार असून यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी कारवायांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील दर सोमवारी सांगलीला येत आहेत. या दौर्यात पोलीस अधिकार्याची एक बैठक झाली की जुन्या सहकार्यांच्या घरी आवर्जुन जाउन चहापाण्याचा सोपस्कार पार पाडत आहेत. मात्र, अद्याप त्यांची पावले तासगावकडे वळली नसल्याचे दिसत आहे. यामुळे काकांच्या घरवापसीला दादांचा हिरवा कंदिल कधी मिळतो याकडे लक्ष असून काकांचे प्रयत्न मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याबरोबरच विधान परिषदेची संधी मिळते का याकडे अधिक असल्याचे सांगितले जात आहे.