माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र रेवण्णा आणि नातू प्रज्ज्वल रेवण्णा या दोघांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच नातवाने देशाबाहेर पलायन केल्याचे समोर आले आहे. कर्नाटकात देवेगौडा यांच्या पक्षाची भाजपबरोबर युती असून, दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघातील प्रचारात हा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत.
देवेगौडा यांचे आमदार पुत्र रेवण्णा यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ही महिला रेवण्णा यांच्या पत्नीची नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. ही महिला रेवण्णा यांच्या निवासस्थानी स्वयंपाकाचे काम करीत होती. पत्नी घरात नसल्यावर रेवण्णा हे आपला लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार या महिलेने दाखल केली आहे. याशिवाय रेवण्णा यांचे खासदार पुत्र प्रज्ज्वल हे आपल्या मुलीला दूरध्वनी करून आश्लील संभाषण करीत असत, अशी तक्रार करण्यात आली आहे. मुलीला घरी घेऊन येण्याचे रेवण्णा पुत्र आपल्याला फर्वामीत असत. मुलीनेही खासदाराच्या विरोधात तक्रार केली आहे.
हेही वाचा : “काँग्रेसमध्ये नातेवाईकांना तिकीट, कार्यकर्त्याला किंमत नाही”; माजी मुख्यमंत्र्याची टीका
देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा हे गेल्याच आठवड्यात मतदान झालेल्या हसन मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजप युतीचे उमेदवार होते. विशेष म्हणजे प्रज्ज्वल यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध होता. पण देवेगौडा यांनी नातवालाच उमेदवारी दिली होती. तसेच प्रचारासाठी मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. तक्रार दाखल झाली तेव्हाच प्रज्ज्वल हे देशाबाहेर गेल्याचे समजते. प्रज्ज्वल हे फ्रान्समध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कर्नाटक पोलिसांनी हे प्रकरण विशेष चौकशी पथकाकडे वर्ग केले आहे. विशेष चौकशी पथकाकडून आता या तक्रारींची चौकशी केली जाईल. कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी १४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. देवेगौडा यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा प्रचारात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.