Manmohan Singh Latest News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे भारताच्या परराष्ट्र धोरणात आणि राजकीय सामर्थ्यात बदल घडवून आणणारे व्यक्तिमत्व होते. जागतिक स्तरावर त्यांनी भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले. गेल्या सात दशकांमध्ये फारच कमी पंतप्रधांना अशी कामगिरी करता आली आहे. शीतयुद्धानंतरच्या काळात मनमोहन सिंग यांनी अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. यामुळे भारताला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करता आली, भारतासाठी हा सुवर्णक्षण होता. अणुकरारासाठी मनमोहन सिंग यांनी थेट पंतप्रधानपद पणाला लावलं होतं.
भारत-अमेरिका अणुकरार
२००८ मध्ये भारत-अमेरिका अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे भारताचे जगभरातील देशांबरोबर विशिषत: पाश्चिमात्य देशांशी सहकार्य आणि योगदान वाढण्यास मदत झाली. मनमोहन सिंग यांनी त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याबरोबर चांगले संबंध निर्माण केले. भारतीय नागरिकांचे तुमच्यावर विशेष प्रेम आहे, असं सिंग यांनी बुश यांना सांगितलं होतं.
हेही वाचा : Manmohan Singh : माहिती अधिकार कायदा : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड
अणु करारामुळे जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इतर देशांचे भारताबरोबरचे सहकार्य वाढले. कारण, कराराने भारतासाठी तंत्रज्ञान नाकारण्याच्या व्यवस्थेला संपुष्टात आणले. मनमोहन सिंग यांनी ज्या प्रक्रियेची कल्पना केली, त्यामुळे भारताला विश्वसनीय भागादीर म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताचा विकास आणि उदय होण्यास मदत करण्यासाठी सिंग यांनी पाश्चात्य भागीदारांशी संबंध विकसित केले.
अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम
१९९१ मध्ये आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यांना जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत भारताच्या वाढीचे महत्त्व कळले होते. ज्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यमान सरकारला घेता येईल. २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले. आर्थिक संकटानंतर G20 च्या शिखर परिषदेची बैठक झाली तेव्हा सिंग हे जागतिक नेते होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते ब्रिटिश चॅन्सलर गॉर्डन ब्राउन, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे ते जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांचे मनमोहन सिंग हे आर्थिक गुरू होते. ओबामा यांनी एकदा त्यांचे तसे वर्णन केले होते.
मनमोहन सिंग यांनी भारताचे पाश्चिमात्य देश अमेरिका, फ्रान्स, जपान आणि जर्मनी या देशांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेतला. जपानचे पंतप्रधान आबे यांच्याबरोबर त्यांनी क्वाड संघटनेच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली होती. मनमोहन सिंग यांना अमेरिकाबरोबर मजबूत संबंध विकसित करायचे होते. चीनबद्दलही त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली बीजिंगने भारतावर दबाव वाढण्यास सुरुवात केली होती. एप्रिल २०१३ मध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला होता. परंतु, सिंग अजिबात मागे हटले नाहीत. परिणामी तीन आठवड्याच्या आत हा मुद्दा सोडवण्यात आला.
पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न
पाकिस्ताबरोबरचे भारताचे संबंध सुधारावेत यासाठी मनमोहन सिंग यांनी प्रयत्न केले. मात्र, पाकिस्ताने त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान निर्माण केले. नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतात बदला घेण्याची मागणी वाढली. परंतु, सिंग यांनी संयम दाखवत पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी दबावात्मक कूटनीतीचा वापर केला. परिणामी संपूर्ण जगाने विशेषत: पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानकडे दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा देश म्हणून पाहिले.
मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान मुशर्रफ यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी संघटनांना भारतात कारवाया करण्यापासून रोखले जाईल, अशी हमी मुशर्रफ यांनी दिली. मात्र, सिंग यांनी त्यांच्या हमीला कधीही गांभीर्याने घेतले नाही, पण हा त्यांचा विजय होता. मनमोहन सिंग यांचा जन्म सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतातील गाह गावात झाला होता. एकदा त्यांनी तिथे जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. परंतु, राजकीय हतबलतेमुळे त्यांना जन्मगावी जाता आले नाही. मनमोहन सिंग यांनी भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानचे ताणलेले संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अनौपचारिक चर्चेच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला. मात्र याला यश मिळालं नाही.
हेही वाचा : Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!
पाकिस्तानला अजिबात जुमानले नाहीत
मनमोहन सिंग यांचे अमेरिकाबरोबरचे संबंध आणि पाकिस्तानबद्दलची त्यांच्या मनातील शंका एप्रिल २००९ मध्ये पत्रकाराशी झालेल्या संभाषणातून स्पष्ट झाली. रेसकोर्स रोडवरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी नारायण मूर्ती यांच्या “ए बेटर इंडिया, ए बेटर वर्ल्ड” या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. त्यावेळी सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, चिंतेत असलेल्या दिल्ली सरकारला वॉशिंग्टनने हमी दिली आहे की, पाकिस्तानकडे असलेले अणु शस्त्र सुरक्षित आहेत. कारण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना अणु शस्त्रांचा वापर करण्याची भीती व्यक्त केली जात होती.
या प्रकरणात भारताला पाकिस्तानी आस्थापनांपर्यंत प्रवेश नव्हता. अमेरिकेला थेट प्रवेश असल्याने त्यांनी भारताला हे आश्वासन दिले होते. सीमेपलीकडील घटना आणि पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रास्त्रांबाबत भारताला काळजी आहे का, असे विचारले असता, मनमोहन सिंग म्हणाले की, “चिंतेचे कारण आहे. पण आम्हाला हमी मिळाली आहे की त्यांचे अणु शस्त्र सुरक्षित हातात आहेत. अमेरिकेने ही हमी दिली आहे, कारण पाकिस्तानच्या आस्थापनांमध्ये त्यांना प्रवेश आहे… आपल्याकडे थेट प्रवेश नाही.”
२००८ मध्ये ढाका येथे शेख हसीना सत्तेवर आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी बांगलादेशाबरोबर चांगले संबंध निर्माण केल्याचे काम केले. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीस्ता नदीच्या पाणी वाटप करारात अडथळा आणला होता. दरम्यान, २००४ ते २०१४ असे तब्बल एक दशक डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पद भूषविले होते. पदावर असताना विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर विखारी टीका केली. मात्र या टीकेमुळे विचलित न होता डॉ. मनमोहन सिंग काम करत राहिले. केंद्र सरकारने त्यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून उद्या २८ डिसेंबर रोजी सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.