नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भाजपामध्ये ‘अशोकपर्व’ अवतरल्यानंतर मागील १० वर्षांपासून या पक्षात काम करणार्‍या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या पाठोपाठ माजी गृहराज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर यांनीही भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंगळवारी येथून पाठविलेल्या जेमतेम तीन ओळींच्या पत्रात डॉ.किन्हाळकर यांनी पक्षातील पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपाने त्यांच्यावर भोकर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली होती. पण सहा महिन्यांपूर्वी भाजपात आल्यावर भोकरच्या ‘सात-बारा’वर आपला व आपल्या परिवाराचा दावा सांगणार्‍या चव्हाण यांची एकंदर व्यूव्हरचना व कार्यशैली ओळखून किन्हाळकर यांनी पक्षाचा निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ.किन्हाळकर १९९० ते ९९ दरम्यान काँग्रेस पक्षाचे भोकरचे आमदार होते. आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते या पक्षात गेले; पण नंतर त्यांना विधानसभेवर निवडून येता आले नाही. २००९ साली मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध भोकरमधून लढण्याचे धाडस त्यांनी दाखविले. पराभव झाला, तरी नंतर चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक आयोगासमोर त्यांनी पुकारलेली कायदेशीर लढाई देशभर गाजली होती.

हेही वाचा…भाजपचे सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित

डॉ.किन्हाळकर यांनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला. या पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती. पण पक्षनेतृत्वाने मागील काही वर्षांत त्यांना बेदखल केले होते. चार महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाने किन्हाळकर यांना नांदेडमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तेव्हा त्यांना राजकीय निर्णय करता आला नाही. आता भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पुढील राजकीय निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former state minister dr madhav kinhalkar resigns from bjp did not reveal next political decision yet print politics news psg