आधी नव्या नेत्याचे कौतुक करायचे मग जुन्या नेत्यांनाच शिव्या द्यायच्या, असा अस्वस्थ करणारा एक नवा ट्रेंड सध्या प्रचलित झाला आहे, अशी टीका माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवणाऱ्या पक्षबदलू राजकीय नेत्यांवरील त्यांची ही टीका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच पक्षांतर विरोधी कायदा अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. व्यंकय्या नायडू यांनी निवडणुकीपूर्वी मोफत गोष्टी देण्याच्या आश्वासनांवरही हरकत नोंदवली. फक्त शिक्षण आणि आरोग्य या दोनच गोष्टी मोफत असायला हव्यात, असेही ते म्हणाले.
पक्षबदलू नेत्यांवर कठोर टीका
“सकाळी तुम्ही एका पक्षात असता, दुपारी दुसऱ्याच पक्षात असता… दुसऱ्या दिवशी निवडणुकीचे तिकीट मिळाल्यावर आधी तुम्ही तुमच्या नव्या नेत्याचे तोंडभरून कौतुक करता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जुन्या नेत्यालाच शिव्या देता, असा एक नवा ट्रेंड देशात उदयाला आला आहे. आज एकाचे कौतुक, उद्या दुसऱ्याच पक्षात जायचे आणि मग पहिल्याला शिव्या घालायच्या, असा हा ट्रेंड आहे.” हा प्रकार अस्वस्थ करणारा आहे, असे मत नायडू यांनी मांडले आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर ते बोलत होते. हे विधान कोणत्याही पक्षाला उद्देशून केलेले नसून आपण सर्वसाधारण निरीक्षण मांडत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
लोकशाहीमध्ये पक्ष बदलण्यास परवानगी आहे. मात्र, नेत्यांनी आधी पक्षातील सर्व प्रकारच्या पदांचा राजीनामा दिला पाहिजे. “पक्ष बदलल्यानंतर आधीच्या नेत्यांवर आरोप करणे मी समजू शकतो, मात्र अपमानास्पद भाषा वापरणे कटाक्षाने टाळले पाहिजे” असेही ते म्हणाले. आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण फक्त भाजपासोबतच एकनिष्ठ राहिलो असल्याचेही त्यांनी आवर्जुन नमूद केले.
काँग्रेसमधील अनेकांना भाजपानेच केले आहे आयात
व्यंकय्या नायडू यांचे हे विधान अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमधून अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आहे आणि त्यांना उमेदवारीही दिली आहे. विशेषत: काँग्रेसमधून भाजपामध्ये येणाऱ्या नेत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भाजपाने दिलेल्या एकूण ४३३ उमेदवारांपैकी एक चतुर्थांशहून अधिक उमेदवार हे इतर पक्षातून आयात केलेले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपामधून काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेले नेते फारच कमी आहेत. या निवडणुकीमधील अशा उमेदवारांचा विचार करता बिहारच्या मुझफ्फरपूरमधील अजय निशाद आणि राजस्थानमधील चुरुच्या राहुल कासवान यांचा समावेश यामध्ये आहे.
फुकटेगिरीची आश्वासने हा ‘अनहेल्दी ट्रेंड’
२००२ ते २००४ या काळात व्यंकय्या नायडू भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. उपराष्ट्रपती होण्याआधी ते केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘फुकटेगिरी’तून काही गोष्टी मोफत देण्याची आश्वासने हा एक ‘अनहेल्दी ट्रेंड’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “अनेक पक्ष मोफत गोष्टी देण्याचे आश्वासन देत आहेत, मात्र पैसे कुठे आहेत, याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. मी अशाप्रकारे मोफत गोष्टी देण्याच्या विरोधात आहे. फक्त शिक्षण आणि आरोग्य या दोनच गोष्टी मोफत असायला हव्यात. बाकी ‘फुकटेगिरी’ टाळायला हवी”, असे ते म्हणाले.
हेही वाचा : “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?
रेवडी संस्कृतीवर मोदींची टीका, तरीही तिचे पालन
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनीही अशा ‘फुकटेगिरी’वर आसूड ओढले होते. ही ‘रेवडी संस्कृती’ असल्याची टीका त्यांनी केली होती. मात्र, दुसरीकडे भाजपानेच गेल्या वर्षी अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अनेक कल्याणकारी योजनांची आश्वासने दिली होती. या आश्वासनांमुळे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील आपला विजय सुकर झाला असल्याचेही अनेक नेत्यांनी मान्य केले होते.