सातारा : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा या वेळीही कायम राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील आठपैकी तब्बल चार आमदार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी मंत्र्यांचे खातेवाटप होताच पालकमंत्री पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील यापूर्वी चार मुख्यमंत्री दिले आहेत. आता या मंत्रिमंडळात चार कॅबिनेट मंत्री आहेत.भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण), राष्ट्रवादीचे मकरंद पाटील (वाई), शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. भाजपचे दोन मंत्री व चार आमदार असल्याने भाजपलाच व शिवेंद्रसिंहराजेंना पालकमंत्रिपद मिळावे अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे. भाजपला जिल्हा परिषद ,पंचायत समित्यांची सत्ता हवी असल्याने त्यांचा पालकमंत्री पदासाठी आग्रह आहे. साताऱ्यात राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. उदयनराजे यांच्याकडे सध्या भाजपचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी ही मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा >>>कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री आग्रही; प्रत्येक खात्याला १०० दिवसांचे ठोस नियोजन करण्याचे निर्देश
साताऱ्याच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वर्षांआधी प्राबल्य होते. आजही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत. त्यामुळे पक्षबांधणीसाठी व जिल्ह्यात पुन्हा प्राबल्य मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालकमंत्री पदाची मागणी केली आहे. पवार यांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवले आहे. आता मकरंद पाटील यांना मंत्रिपद देऊन वाईत डबल धमाका केला आहे. शरद पवारांना या जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी शिकस्त करावी लागेल. याचाच फायदा उचलत मकरंद आणि नितीन पाटील यांच्या माध्यमातून अजित पवार साताऱ्यात पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना पालकमंत्रिपद हवे आहे. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यासाठी अजित पवारांकडे आग्रह धरला आहे.
हेही वाचा >>>Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग म्हणाले होते, “…तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ”!
शंभूराज देसाई यांना पालकमंत्री पदावरून बदलण्याचा दबाव आमदारांकडून वरिष्ठांवर आणण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घराणे नांदवळ (ता. कोरेगाव) येथून बारामतीत स्थायिक झाले आहे. त्यामुळे शरद पवारांइतकेच अजित पवारांचेही साताऱ्याकडे तेवढेच लक्ष असते.
या वेळी मंत्रिमंडळात अर्धा अधिक सातारा जिल्हा कार्यरत राहणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा या वेळीही कायम राहणार आहे. पालकमंत्रिपदाबाबत चारही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल असे शिवेंद्रसिंहराजे व मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. पर्यावरण मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री झाल्यासारखे जिल्हा प्रशासनाला खडे बोल सुनावत कामाला लागले आहेत.